
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस नसल्यामुळे तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. तसेच सध्या गौरी गणपतीचे सणाचे दिवस असल्याने सायंकाळचे विज भारनियमन महावितरण विभागाने रद्द करावे अशी मागणी भाजपा युवा नेते व मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी आज येथे केली. याबाबत अधिक बोलताना बागल म्हणाले की, करमाळा तालुक्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक मध्यम

प्रकल्प तलाव यामध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नाही खरिपाची पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली असून रब्बीकरता आवश्यक पाऊस अद्यापही सुरू झालेला नाही. ज्या शेतकऱ्यांची पिके कशीबशी त्यांनी जगवली आहेत त्यांनाही विजेच्या भारनियमानामुळे नुकसान पोहोचत आहे तसेच सध्या गौरी गणपतीचे महत्त्वाच्या सणांचे दिवस सुरू असल्याने करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या होणारे विजेचे भारनियमन हे जनतेला त्रासदायक होत आहे. सायंकाळी होणाऱ्या वीज भारनियमनामुळे चोऱ्यांचे प्रकार घडण्याची शक्यता आहे तसेच या भारनियमानामुळे ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक विद्यार्थी, महिलावर्ग, शेतकरी या सर्वांनाच प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने विचार होऊन करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील होणारे सायंकाळचे भार नियमन रद्द होणेबाबत विनंती पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूरचे जिल्हाधिकारी, तसेच अधीक्षक अभियंता महावितरण यांना दिले असल्याची माहिती शेवटी दिग्विजय बागल यांनी दिली.