करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ कारखान्याच्या मागील कारभाराबाबत काल आमदार नारायण आबा पाटील गटाकडून बागल गटावर आरोप करण्यात आले होते. परंतू बागल गटाकडून या आरोपाचे खंडण करण्यात आले नसुन माजी आमदार संजयमामा शिंदे गटाकडून उपसभापती अजित विघ्ने यांनी प्रत्युत्तर दिले. यावर आता आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी झोड उठवली असुन यावर सविस्तर बोलताना तळेकर म्हणाले की, आम्ही आदिनाथ कारखान्याच्या मागील कारभाराबाबत जास्त काळ सत्ता भोगलेल्या बागल गट नेतृत्वास काही प्रश्न विचारले असता बागल गटाकडूनच या प्रश्नांची उत्तरे अथवा आरोपांचे खंडन करणे अपेक्षित होते. परंतू माजी आमदार संजयमामा शिंदे गटाकडून उगीचच उपसभापती अजित विघ्ने यांनी बागल कुटुंबाचे राजकीय वकीलपत्र स्वीकारण्याचे काही कारण नाही. मराठी मध्ये एक प्रचिलत म्हण आहे की “उगाचच खलबत्त्यात डोके घालणे” याचा अर्थ दुसऱ्याच्या वादात विनाकारण मध्यस्थी करून स्वतःसाठी डोकेदुखी निर्माण करणे असा होय. या म्हणीची प्रचीती अजित विघ्ने यांच्या बोलण्यातुन दिसुन येत आहे. यामुळे आता बागल गटाच्या मदतीने उपसभापती पद मिळवलेल्या अजित विघ्ने यांनी बागलांच्या घरी पाणी भरण्यापर्यंत आपल्या पदाची गरीमा कमी करु नये. जो बागल गट आदिनाथ कारखान्याच्या अधोगतीस कारणीभूत आहे त्या बागल गटाच्या नेतृत्वास उत्तर अथवा स्पष्टीकरण देऊ द्यावे. अन्यथा बागल व शिंदे गटांकडुन एकत्रीत पत्रकार परिषद घेऊन आदिनाथच्या इतिहासाबद्दल बोलावे. आदिनाथ कारखान्याच्या बाबतीत आमदार नारायण आबा पाटील यांची भुमिका स्पष्ट आहे. आदिनाथ हा सभासदांच्या मालकी हक्काचा रहावा आणि आदिनाथ कारखाना उर्जित अवस्थेत यावा. यामुळे आदिनाथ बाबत आमदार नारायण आबा पाटील हे शेवटपर्यंत लढा देत राहतील. वेळप्रसंगी आंदोलन करण्याची वेळ आली तरी हरकत नाही. परंतू बागलांनीच आदिनाथ कर्जाच्या खाईत लोटला यावर आम्ही ठाम आहोत. याउलट साखर कारखाना बंद पाडणारे आणि कारखाना चालवता नाही आला म्हणुन विकुन टाकणारे बागल व शिंदे हे एकत्र येऊन एकमेकांना सावरत आहेत ही बाब सभासदांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. अजित विघ्ने हे आदिनाथ कारखान्याच्या मागील सतरा वर्षाच्या कारभारावर बोलले तर एका तासात त्यांचे उपसभापती पद बागल गट काढून घेणार हे मात्र नक्की आहे. यामुळे आपले पद वाचवण्यासाठी अजित विघ्ने हे बागलांची बाजु मांडत आहेत असा मार्मिक टोला प्रवक्ते सूनील तळेकर यांनी लगावला.