करमाळा प्रतिनिधी

कै.डॉ.शुभदा वसंतराव पुंडे स्मृतीदिन
स्मृती जेव्हा संस्कार बनते… तेव्हा सेवा अखंड प्रवाहित राहते..!
माणूस जगातून निघून जातो; पण त्याच्या जगण्यामागची संवेदना, त्याने जपलेली माणुसकी आणि त्याच्या स्मृतीतून उभे राहिलेले सेवाकार्य समाजाच्या मनात दीर्घकाळ उजेड देत राहते. काही स्मृती डोळ्यांत अश्रू आणतात, तर काही स्मृती हातात वही देऊन नव्या पिढीच्या भविष्यावर आशेची अक्षरे लिहितात.
साडे हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, साडे ता. करमाळा येथे कै. डॉ. शुभदा वसंतराव पुंडे यांच्या स्मरणार्थ डॉ. वसंतराव पुंडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वह्यावाटपाचा उपक्रम म्हणजे स्मृतीला सेवेत आणि दुःखाला दातृत्वात रूपांतरित करणारा एक प्रेरणादायी सोहळा होता.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहून माझ्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्याचा योग आला. विद्यार्थ्यांच्या हातात वही देताना मनात एकच विचार उमटत होता,वहीतील प्रत्येक कोरे पान हे केवळ लिहिण्यासाठी नसते; ते विद्यार्थ्याच्या स्वप्नाला दिशा देण्यासाठी असते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भविष्यातील करिअरची निवड, बदलत्या जागतिक घडामोडी, शिक्षणव्यवस्थेतील नवीन संधी आणि ज्ञानाधिष्ठित जगात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या केवळ घोषणा नसून भावी पिढीच्या अस्तित्वाशी जोडलेल्या सामाजिक जबाबदाऱ्या आहेत, हे विद्यार्थ्यांच्या मनावर अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
ग्रामीण भागात जन्माला येणे ही मर्यादा नसते; मर्यादा असते ती आपल्या विचारांची. साधनांची कमतरता माणसाला थांबवत नाही, तर स्वप्नांची कमतरता त्याची वाट रोखते. विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सामर्थ्य ओळखून आत्मविश्वासाने भविष्याकडे पाहावे, हा संवादाचा केंद्रबिंदू होता.
गेली सलग तेवीस वर्षे पुंडे परिवाराच्या पुढाकारातून हा वह्यावाटपाचा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. एखादा उपक्रम एक वर्ष राबविणे सहज असते; पण तो तेवीस वर्षे सातत्याने सुरू ठेवण्यासाठी दातृत्वाबरोबरच समाजाप्रतीची निष्ठा आणि अंतःकरणातील सेवाभाव आवश्यक असतो. डॉ. वसंतराव पुंडे आणि संपूर्ण पुंडे परिवाराने जपलेली ही सेवापरंपरा निश्चितच अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे. त्यांच्या या प्रकाशमान वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिका डॉ. अंजली श्रीवास्तव मॅडम उपस्थित होत्या. आपल्या प्रभावी अध्यक्षीय मनोगतात त्यांनी मोबाईलचा अतिरेकी वापर आणि सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर होणारे परिणाम याविषयी अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले. विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर न करण्याचा घेतलेला निर्णय हा काळाच्या प्रवाहाविरुद्ध उभा राहिलेला संस्कारशील निर्धार आहे. डॉ. श्रीवास्तव मॅडम यांनी या उपक्रमाचे केलेले कौतुक विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले.
डॉ. वसंतराव पुंडे यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाचा न्यूनगंड न बाळगण्याचा मौलिक संदेश दिला. “ग्रामीण मातीत जन्मलो म्हणून आपण मागे राहत नाही; आपल्या काळजात आई वडिलांच्या कष्टांची जाणीव आणि डोळ्यांत ध्येयाचा प्रकाश असेल, तर आपण कोणत्याही मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतो,” हा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वासाचे बीज पेरणारा ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्या नीलिमा पुंडे मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, हे त्यांनी अत्यंत समर्पक शब्दांत स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ बापू पाटील, बाजीराव माने, हेमंत पुंडे, बाळासाहेब ढवळे सर आदी मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची उंची वाढविणारी ठरली.
विद्यालयाचे प्राचार्य सतीश ढवळे सर यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रसिद्ध निवेदक तथा शिक्षणभारतीचे प्रा. सचिन गाडेकर सर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. सचिन कुलकर्णी यांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले. अखेरीस प्राचार्या नीलिमा पुंडे मॅडम यांच्या सुमधुर आवाजातील पसायदानाने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता झाली.
कै. डॉ. शुभदा वसंतराव पुंडे यांच्या स्मृतीला यशकल्याणी परिवाराकडून विनम्र अभिवादन…!
त्यांच्या स्मृतीतून सुरू असलेला हा ज्ञानदानाचा प्रवाह असाच अखंड वाहत राहो. या वह्यांतील प्रत्येक पानावर विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य आकाराला येवो आणि पुंडे परिवाराच्या दातृत्वाचा हा दीप समाजातील अनेक संवेदनशील मनांना सेवेसाठी प्रेरित करीत राहो, हीच सदिच्छा..!

स्मृतीला अश्रूंची किनार असते;
पण सेवेत रूपांतरित झालेली स्मृती
समाजाच्या भविष्याला प्रकाश देत राहते…!

प्रा.गणेश करे-पाटील
यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था,पुणे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *