
करमाळा प्रतिनिधी
काल करमाळा मतदार संघातील अनेक गावात वादळी वारे आले होते. विशेषतः करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील पोमलवाडी, गुलमोहरवाडी, भगतवाडी, केत्तूर,खातगांव, पारेवाडी, हिंगणी, आदि भागासह अनेक गावातील केळी जमिनदोस्त झाली आहे. याबाबत आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, काल रात्री करमाळा मतदार संघातील अनेक ठिकाणी वादळवारे आल्याने काही ठिकाणी राहती घरे तर अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

याबाबत आपण प्रशासनाला सुचना केल्या असून महसुल व तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके यांना तातडीने प्रत्यक्ष कार्यस्थळावरील नुकसानीची माहिती घेऊन अहवाल तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार नुसार पोमलवाडी ता.करमाळा येथील जग्ननाथ मारुती नवले & शालन जग्गनाथ नवले यांचा राहत्या घरी वादळाने घर पडून मृत्यू झाल्याचे समजले आहे. तसेच रवी माळशिकारे (गुलमोहरवाडी), उमेश नवले (पोमलवाडी), दयाल माने (गुलमोहरवाडी)

आदिसह अनेक शेतकऱ्यांनी आमदार कार्यालयास भ्रमणध्वनी द्वारे प्रत्यक्ष केळीचे व शेतकऱ्याची शेतीचे सोलर पंप यंत्रणा विस्कळीत झालेल्या नूकसानीचे फोटो पाठवून माहिती दिली आहे. यामुळे एकंदरीतच करमाळा तालुक्यातील अनेक गावांना अचानक आलेल्या वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असुन शेतातील उभ्या पिकांवर याचा गंभीरपणे परिणाम झाला आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील हजारो कोटीचे नुकसान झाले असल्याचे लक्षात येत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या

नूकसानीचे अहवाल वरीष्ठ कार्यालयास पाठवण्याच्या सुचना आपण महसुल विभाग व कृषी विभागास दिल्या आहेत. प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी व अंतिम अहवालानुसार आपण शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणुन आर्थिक भरपाई दिली जावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असुन पावसाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न मांडुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.
