

करमाळा प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी व ग्रामीण भागाला दर्जेदार शेत व पाणंद रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत सह-अध्यक्षांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाच्या महसूल विभागाने घेतला आहे. यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, करमाळा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सह-अध्यक्षपदी दिग्विजय दिगंबरराव बागल यांची निवड करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे करमाळा तालुक्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांना अधिक गती मिळून नियोजनबद्ध, समन्वयपूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी होईल. परिणामी शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते सुविधा अधिक जलद उपलब्ध होऊन शेतीमालाची वाहतूक सुलभ होईल आणि ग्रामीण विकासाला निश्चितच चालना मिळेल.
