

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील अतिशय महत्वाच्या पण अनेक वर्ष रखडलेल्या जातेगाव ते टेंभुर्णी अर्थात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ या रस्त्याच्या भुसंपादना बाबत आमदार नारायण आबा पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पावसाळी अधिवेशनात प्रश्न मांडला होता. या प्रश्नांची दखल घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, जातेगाव ते करमाळा ते टेंभुर्णी या महामार्गाच्या कामासाठी भुसंपादन प्रक्रिया पार पडली असुन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मात्र भुसंपादन प्रक्रिया करत असताना करमाळा तालुक्यास न्याय मिळत नाही असे वाटल्याने आमदार नारायण आबा पाटील यांनी सदर रस्त्याच्या भुसंपादन अंतर व मोबदल्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, अहिल्यानगर-जातेगाव-टेंभुर्णी-पंढरपुर-मंगळवेढा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ असुन अहिल्यानगर ते टेंभुर्णी इथपर्यंत रस्त्याचा भाग हा भारतिय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे अख्यत्यारित आहे. दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या ११३ व्या भुसंपादन समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मुख्यालय नवी दिल्ली यांनी दिनांक ८ व ९ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार सदर महामार्ग हे उपलब्ध असलेल्या आर ओ डब्ल्यू मध्ये नियोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार सामान्य रस्ते बांधकामासाठी ३० मीटर आणि स्लिप रोड किंवा सेवा रस्ता असेल अशा ठिकाणी ४५ मीटर घेण्यात आलेले आहे. यामुळे ११३ व्या भुसंपादन समितीच्या शिफारशी नुसार हे क्षेत्र संपादित करण्यात आल्याचे मंत्री यांनी सांगितले आहे.

आमदार नारायण आबा पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न उचलून धरला व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक न्याय व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसरा न्याय असे होऊ नये ही मागणी केल्यानंतर आता आमदार नारायण आबा पाटील यांच्या मागणीची गंभीरतेने दखल घेऊन सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांचेकडे तपशिलवार नोंदी व कार्यवाही असलेला अहवाल मागितला असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली आहे.