
करमाळा वार्ताहर
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील अतिशय महत्त्वाचा असणारा डिकसळ ते कोंढार-चिंचोली दरम्यानचा पूल स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रयत्नातून मंजूर झालेला होता. त्यानंतर सदर पुलाचे काम चालू झालेले होते. सदर पुलाचा ठेका पटेल इंजिनियर्स पुणे या कंपनीने घेतलेला होता, परंतु सन 2024 पासून आज पर्यंत सदर पुलाचे काम ज्या वेगाने व्हायला आवश्यक होते त्या वेगाने झालेले नव्हते. त्यामुळे सदरचे पुलाचे काम तातडीने होणे करिता भागातील सर्व नेते मंडळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत होते.

या पुलाकरता स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी 55 कोटी रुपयांची मंजुरी दिलेली होती. डिकसळ ते कोंढार-चिंचोलीचा पूल हा पश्चिम भागातील लोकांची जीवनवाहिनी असलेला पूल असून करमाळा वरून पुण्याला जाण्यासाठीचा हा अतिशय सोयीस्कर मार्ग आहे. जुन्या पुलावरून आजही प्रचंड वाहतूक होत असून या ब्रिटिशकालीन पुलाची मर्यादा संपलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पुलाची मागणी गेली अनेक वर्षापासून होत होती, सन 2019 च्या निवडणुकीच्या वेळी माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे या पुलाचे कामासाठी 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला मात्र पुढे सदर पुलाचे काम पटेल इंजिनियर्स कंपनी, पुणे यांनी अतिशय संथ गतीने केले. ग्रामस्थ व नेते मंडळी यांनी

केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर पुलाचे काम पुन्हा चालू झालेले असून यासंदर्भात बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषदचे सदस्य सुभाष आबा गुळवे, राजाभाऊ धांडे, डॉ. गोरख गुळवे व ग्रामस्थांनी पुलाच्या कामाचे परिस्थितीची माहिती घेतली असता पटेल इंजिनियर्सचे सहाय्यक इंजिनिअर सोपान पाटील यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, आता पुलाचे काम निरंतरपणे चालू राहणार असून ज्या पद्धतीने कुगाव ते शिरसोडी दरम्यान पुलाचे काम आहे, त्याच पद्धतीने या पुलाचे काम होणार असून डिझाईन मध्ये आवश्यक ते बदल करून आता हे काम होणार आहे.

या ठिकाणचे असणारे पिलर्स साधारण एक ते दीड महिन्यात पूर्ण होणार असून त्यापुढील काम पाणी असताना देखील होणार आहे. त्यामुळे या पुलाचे काम आता अखंडपणे चालू राहणार असून लवकरच डिकसळ ते कोंढार-चिंचोली नवीन पूल प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. सदर पुलाचे काम पुन्हा चालू झाल्यामुळे पश्चिम भागातील व करमाळा तालुक्यातील नागरिकांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण आहे. आज या ठिकाणी ग्रामस्थांसह पाहणी करून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी आढावा घेतला व याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.
