
करमाळा प्रतिनिधी
सतरा वर्षे दहिगाव उपसाचे काम रखडवुन शेतकऱ्यांच्या दोन पीढ्या बरबाद करणाऱ्या बागलांनी या योजनेवर बोलू नये, दहिगाव उपसा सिंचन योजना व्यवस्थित चालू असुन आपणच किती कर्तव्यदक्ष आहोत हे दाखवण्याचा विरोधकांचा प्रयत्न केविलवाणा असल्याचा घणाघात आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर केला. नुकतीच करमाळा येथे पाणी टंचाई निवारणार्थ बैठक पार पडली. सदर बैठकीत जिल्हा परिषद सदस्या रश्मी बागल व माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे पंचायत समिती सदस्य भरत आवताडे यांनी पाटबंधारे अधिकारी राजगुरु यांना चालू आवर्तनावरुन धारेवर

धरण्याचा प्रयत्न केला. यावर आता पाटील गट पुढे आला असुन पाटील गटाकडून प्रवक्ते सूनील तळेकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी व्यक्त होताना तळेकर म्हणाले की, बागल कुटुंबाने सतरा वर्षे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम जाणीवपूर्वक रखडवले होते. या योजनेच्या केवळ काही ठिकाणी चाऱ्या खोदुन ठेवल्या व चालू वर्षी पाणी येईल अशी खोटी आशा शेतकऱ्यांना दाखवत विधानसभेच्या दोन टर्म, आदिनाथ कारखान्याच्या तीन टर्म व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तीन टर्म निवडणुकांमध्ये मते घेतली. परंतु शेवटी शेतकऱ्यांना बागल कुटुंब हे दहिगाव उपसा सिंचन योजनेचा

वापर केवळ सत्ता मिळावी म्हणुन करत आहेत हे लक्षात आल्यावर सन २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी आमदार म्हणुन नारायण आबा पाटील यांना निवडुन दिले. आमदार नारायण आबा पाटील यांनी दोन वर्षातच या योजनेला निधी मंजुर करुन व जमिनस्तरावर स्वतः लक्ष देऊन काम पुर्ण करुन घेतले व योजना कार्यान्वित केली. यामुळे करमाळा तालुक्यातील पुर्व भाग ओलिताखाली आला. आता दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नावर बोलण्यापुर्वी रश्मी बागल ह्यांनी सर्वात प्रथम सतरा वर्षे आपल्याकडून ही योजना रखडली गेली याबद्दल शेतकऱ्यांची माफी मागावी आणि नंतरच त्यांना न्याय देण्याच्या गोष्टी कराव्यात असा टोला तळेकर यांनी लगावला. तर माजी आमदार संजयमामा शिंदे यांना व त्यांच्या

कार्यकर्त्यांना या योजनेचे गांभिर्य नाही व योजनेबद्दल जादा माहितीही नाही. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सध्या केवळ मुख्य कॅनाल द्वारे पाणी दिले जात असताना इतर उपचाऱ्यांमधून पाणी देत असताना शेतकऱ्यांकडून अडवणुक केली जाते. मुळात तीन महिन्यांहुन अधिक काळ पुर्व भागात पाणी चालू असुन जिथे पिकांच्या अडचणी नसतील अशा सर्व ठिकाणी पाणी दिले गेले आहे. जवळपास अठरा गावांमध्ये पाणी दिले गेले आहे तर उर्वरित ठिकाणी बंद पाईपलाईनचे काम चालू असल्याने पाणी दिले तर पाईप मध्ये गाळ अडकला जाऊ शकतो या कारणांमुळे पाणी पोहोच करता आले नाही.

याशिवाय कार्यक्षेत्रात नसलेल्या भागातही पाणी पोहचवण्यात आले आहे. वास्तविक पाहता नियमानुसार उन्हाळी आवर्तन हा प्रकारच नाही परंतु आमदार नारायण आबा पाटील यांनी कालवा सल्लागार समितीमध्ये आग्रही मागणी केल्यानंतर हे आवर्तन जिथे शक्य तिथे पाणी पोहचवत आहे. यामुळे उगीचच आंदोलनाचा फार्स करणे, पाणी टंचाई बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करणे हे प्रकार विरोधकांनी करु नयेत. बागल व शिंदे गटांनी आपल्या इतिहासाची पाने उलगडून जरा पाठीमागे जावे. सतरा वर्षे दहिगाव उपसाचे काम रखडवुन ठेवणाऱ्या बागल गटास व मी बेकायदेशीर कामे करत नाही असे सांगुन वडशिवणे तलावात पाणी न सोडणाऱ्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांना दहिगाव उपसावर बोलण्याचा अधिकार नाही. आमदार नारायण आबा पाटील हे करमाळा तालुक्यातील पाणी टंचाई निवारण करण्यासाठी व पुर्व भागाला पाणी देण्यासाठी समर्थ आहेत, विरोधकांनी उगीचच लुडबुड करु नये असा सुचक इशारा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला.