वळसंग प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वीटभट्टीवर बालमजुरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वळसंग पोलीस प्रशासन आणि महात्मा फुले समाज सेवा मंडळ (MPSSM) यांच्या संयुक्त पथकाने या वीटभट्टीवर छापा टाकून एकूण ११ बालकामगारांची सुटका केली. यामध्ये १४ वर्षांखालील ९ बालकांचा समावेश असून त्यात ५ मुले आणि ४ मुली आहेत.

कारवाईचा सविस्तर तपशील
वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन वीटभट्टीवर अल्पवयीन मुलांकडून कष्टाची कामे करून घेतली जात असल्याची माहिती संस्थेचे तालुका समन्वयक सुजाता कांबळे व वामन बावले यांनी प्रशासनाला दिली. या माहितीच्या आधारे महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि वळसंग पोलिसांनी वीटभट्टीवर अचानक धाड टाकली. तेव्हा तेथे लहान मुले विटा वाहण्याचे आणि माती कालवण्याचे काम करताना आढळली.

सुटका केलेल्या मुलांची माहिती
१४ वर्षांखालील बालके : एकूण ९ (ज्यामध्ये ५ मुले आणि ४ मुली आहेत).
१४ ते १८ वयोगटातील मुले : एकूण २.

मालकावर कठोर गुन्हे दाखल :
धोकादायक ठिकाणी लहान मुलांचे शोषण केल्याप्रकरणी वीटभट्टी मालकावर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत खालील कलमांचा समावेश करण्यात आला आहे:
१. बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा १९८६: कलम ३ आणि १४.
२. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५: कलम ७५ आणि ७९.

पुढील प्रक्रिया
सुटका करण्यात आलेल्या सर्व ११ बालकाच्या बाबतीत बालकल्याण समिती योग्य तो निर्णय घेईल. महात्मा फुले समाज सेवा मंडळ करमाळा आणि पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे बालकामगार ठेवणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. “बालपण हे शिक्षणासाठी आहे, कामासाठी नाही,” असा संदेश संस्थेच्या जिल्हा समन्वयक रजनीगंधा गायकवाड यांनी दिला. यावेळी वळसंग पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक रविराज कांबळे, हेड कॉन्स्टेबल सुनील कुवर आणि त्यांची टीम उपस्थित होती. संस्था अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
