
करमाळा प्रतिनिधी
मंत्रतंत्राच्या नावाखाली धनकवडी येथील एकाची लाखोंची फसवणूक झाल्यानंतर उंदरगाव / घोटीच्या भोंदू मनोहर मामासह त्याचा साथीदार विशाल वाघमारे या दोघांवर करमाळा पोलीसात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत धनकवडी (पुणे) येथील दलाराम शंकरराम सुतार यांनी दि. २८/०४/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी दलाराम यांना व्यवसायात यश येत नसल्याने तसेच मणक्याचा त्रास असल्याने २०२० सालातील कोरोना लॉकडाउन चालु होण्यापुर्वी तीन ते चार महिने अगोदर करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे आरोपी मनोहर भोसले आणि विशाल

वाघमारे यांनी फिर्यादीकडून सुरवातीस ५०००/- रु. व नंतर ५०,०००/- रु. घेवुन पांढ-या रंगाच्या डब्यामध्ये पिवळ्या रंगाची हळदीसारखी पावडर भंडारा म्हणून दिली व त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी आरोपी मनोहरमामा एक धागा फिर्यादीच्या गळ्यात बांधायला देणार आहेत, त्यानंतर फिर्यादीस चांगला फरक पडेल असे सांगुन फिर्यादीकडून त्यांनी १,५१,०००/- रूपयांची मागणी केली. यानंतर १,२१,०००/- रु. हडपसर येथे घेऊन हडपसर येथील आकाशवाणी समोर फिर्यादीला बोलाविले. या ठिकाणी गेल्यावर मनोहर मामाने फिर्यादीच्या गळ्यात एक धागा बांधून एक पुडी दिली. ज्यामध्ये राख व तांदळाचे दाणे

होते व सदरची पुडी पाण्यात टाकुन पिण्याबाबत सांगितले होते. परंतु हा उपाय करून फिर्यादीस कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांनी मंत्र तंत्राच्या नावाखाली फिर्यादीची फसवणुक झाल्याची खात्री झाली.
दलाराम सुतार यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मनोहर भोसले व विशाल वाघमारे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम 3(5), 318 (2), 318 (4) आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ (३) नुसार गुन्हा दाखल केला असून सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

