करमाळा प्रतिनिधी

केत्तुर (ता. करमाळा) येथे नवनिर्मित श्री संत सेना महाराज मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री संत सेना महाराज, श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना व पुण्यतिथी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडला.

उत्सवाची सुरुवात रविवारी (६ सप्टेंबर) भव्य मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीदरम्यान केत्तुर ग्रामस्थांनी घरांसमोर आकर्षक सडे-रांगोळ्या काढून मूर्तींचे पूजन केले.

सोमवारी (७ सप्टेंबर) सकाळी गणेश काका कुलकर्णी यांच्या हस्ते होमहवण विधी संपन्न झाला. त्यानंतर ह.भ.प. लक्ष्मण महाराज झेंडे यांच्या हस्ते मूर्तींची स्थापना करण्यात आली. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हरिपाठ व रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. लक्ष्मण महाराज झेंडे यांचे सेवापुष्प म्हणून कीर्तन पार पडले.

मंगळवारी (८ सप्टेंबर) पहाटे काकड आरती झाली. सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांचे ‘संत सेना महाराज चरित्र’ व ‘काल्याचे कीर्तन’ संपन्न झाले. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यातील मूर्तींचे सौजन्य विलास भगवान कोकणे, राजाराम लक्ष्मण कानतोडे, मारूती पंढरीनाथ ठणके, नानासाहेब बाबुराव मोहीते, बापू ज्ञानदेव मोहीते व प्रकाश राजाराम देवकर यांनी केले. तसेच सर्व संत सेना महाराज समाज बांधवांनी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे देणगी देऊन या कार्याला मोलाचे योगदान दिले.

उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *