
करमाळा प्रतिनिधी
स्वयंअर्थ सहाय्यता शाळांच्या विविध मागण्यांबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती, शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सदर शाळांना चालवित असताना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे.

त्याअनुषंगाने आम्ही संघटनेच्या वतीने मागण्या करीत आहोत. शासन निर्णयाप्रमाणे आर.टी.ई. प्रतिपूर्तीची रक्कम मिळावी तसेच ती वेळेत मिळावी, आर.टी.ई. विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळीच सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच प्रवेश द्यावा. नंतर वेळोवेळी कागदपत्राची मागणी करू नये, शिक्षणमंत्री यांच्या तोंडी आदेशानुसार आर.टी.ई. पात्र विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश देण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सर्व साहित्य ३१ मे पूर्वी सर्व शाळांना मिळावेत, तालुका तसेच जिल्हास्तरावर आलेल्या सर्व फाईल्सचा वेळेत निपटारा व्हावा, इंग्रजी माध्यमाच्या शाळेविषयी आलेल्या तक्रारींची शहानिशा करूनच पुढील आदेश निर्गमित करावे, जि.प.च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सर्व पुरस्कारांसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश करावा, NMMS स्कॉलरशिप इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लागू कराव्यात. वरील सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे

यावेळी प्रदेश अध्यक्ष हरिष शिंदे, प्रदेश सचिव गणेश नीळ, जिल्हा सचिव शरद अनंतकवळस, जिल्हाध्यक्ष संभाजी घाडगे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार ,जिल्हा संघटक गणपत मोरे, जिल्हा खजिनदार अमोल दुरंदे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख हरिश्चंद्र गाडेकर, मार्गदर्शक नितीन भोगे, कृष्णदेव मदने, शिवाजीराव पवार आदीजण उपस्थित होते.

………………
स्वयंअर्थ सहाय्यता इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या विविध मागण्यांच्या संदर्भा बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम, जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती चेतनसिंह केदार सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना भेटून निवेदन दिले. सर्वांबरोबर व्यवस्थित चर्चा केली. येणाऱ्या काळामध्ये योग्य समन्वय साधला जाईल. सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी मीटिंग घेतली जाईल, असे आश्वासन शिक्षण सभापती तसेच शिक्षण अधिकारी यांनी दिले. मुख्य कार्यकारी यांनी लवकरच या मागण्यांच्या संदर्भात सर्व विभाग प्रमुखांबरोबर बैठक लावण्याचे आश्वासन दिले.