
करमाळा प्रतिनिधी
महिला महोत्सवातील स्पर्धात्मक कार्यक्रम महिलांचे मनोबल उंचावणारे असून यास मिळणारा प्रतिसाद वाखाणण्याजोगा असल्याचे प्रतिपादन महिला नेत्या ज्योतीताई पाटील यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही जेऊर ता.करमाळा येथे आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज फनी गेम्स झोनचे उद्घाटन आमदार नारायण आबा पाटील यांच्या सुविद्य पत्नी ज्योतीताई नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो महिला फनी गेम्स मध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक होत्या. उद्घाटन प्रसंगी अधिक बोलताना ज्योतीताई म्हणाल्या की,

हा महिला महोत्सव महिलांच्या कलागुणांना वाव देणारा असुन फनी गेम्स सारखे उपक्रम हे महिलांसाठी रोजच्या ताणतणावातुन विरंगुळा देणारे ठरतील. यातील समाविष्ट जवळपास अठ्ठावीस गेम्स हे महिलांची करमणूक तर करतीलच पण त्याच बरोबर यात कौशल्याचा कस सुध्दा लागणार आहे. संयोजक दरवर्षी काही नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित करत असतात याचा फायदा निश्चितच महिलांना होत आहे. खेळ पैठणीचा या प्रसिद्ध खेळास पर्यायी खेळ म्हणुन फनी गेम्स झोन हा निश्चितच सर्वदुर प्रसिद्ध होईल व महिलांची यास पसंती असणार अशी खात्री ज्योतीताई पाटील यांनी

बोलून दाखवली. गेल्या २४ वर्षांपासून आमदार नारायण आबा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेला महिला दिनानिमित्त ‘महिला महोत्सव’ एक वेगळेपण टिकवून आहे याचा प्रत्यय यातील कार्यक्रमातुन दिसुन येत असुन आज तिसरा दिवस हा सुद्धा महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन गाजवला आहे. उद्या पाककला, गीत सादरीकरण व अंताक्षरी तसेच नव्याने समावेश केलेली गीतगायन स्पर्धा आदि कार्यक्रम होणार असून महिलांनी यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.