
करमाळा प्रतिनिधी
जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विचार, भावना, मन आणि कृती यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्याच्या माध्यमातून आनंदी व अर्थपूर्ण जीवन जगता येते, असे प्रतिपादन ‘प्रोलक्स ग्लॅमोवेल अँड वेलनेस प्रा. लि.’च्या संस्थापिका डॉ. प्रचिती पुंडे यांनी केले.

कमला भवानी बहुउद्देशीय संस्था संचलित ध्यान, योग साधना व सेवा केंद्र, करमाळा यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित प्रेरणादायी व्याख्यानात त्या ‘जीवनात बदल घडविणारी साधने (पंचशक्ती सूत्र)’ या विषयावर बोलत होत्या.
डॉ. पुंडे यांनी गुरुचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट करत सकारात्मक विचार, मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि आनंदी जीवनासाठी उपयुक्त सूत्रांचे सविस्तर विवेचन केले. विशेषतः महिला भगिनींसाठी आरोग्य, आत्मविश्वास, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि वैयक्तिक प्रगती याबाबत त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध योगमुद्रा आणि श्वसनाचे व्यायाम यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवत उपस्थितांना उत्साहवर्धक व सहजसुंदर शैलीत मार्गदर्शन केले.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित हे विनामूल्य व्याख्यान प्रेरणादायी विचार, जीवनमूल्ये आणि योगसाधना यांचा सुरेख संगम ठरले.
या प्रसंगी डॉ. प्रचीती पुंडे यांना यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्यावतीने मानाची पैठणी भेट देण्यात आली. या उपक्रमातून उपस्थितांना दैनंदिन जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची नवी दिशा मिळाली.
कार्यक्रमास यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश करे-पाटील, नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद फंड, सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण लावंड, संतोष शेठ शियाळ, मुख्याध्यापक हनुमंत पाटील, नवनाथ थोरात, प्रा. विष्णू शिंदे यांच्यासह करमाळा व परिसरातील नागरिक, युवक-युवती, महिला आणि योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षिका संध्या थोरे व योगसाधक शिक्षक अशोक बरडे यांनी सूत्रसंचालन केले. योगशिक्षिका रेशमा जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी व्यासपीठावर मान्यवर डॉ. गणेश करे पाटील, प्राचार्य मिलिंद फंड, बाळकृष्ण लावंड, अशोक बरडे,माधुरी पवार, रेखा शिंदे, नरारे, संध्या थोरे आदि उपस्थित होते.