
करमाळा प्रतिनिधी
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे सर्वच आरोग्य कर्मचारी पगाराविना आहेत असे निवेदन शिवसेना ओबीसी जिल्हाध्यक्ष सुयश कर्चे यांनी गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांना दिले.
निवेदनात असे म्हटले आहे की, मु.पो. जेऊर ता. करमाळा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नदीप टोपे हे मागील चार ते पाच वर्षांपासून कारभार पाहत आहेत.

संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्या मनमानी कारभाराबाबत रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी यांनी वेळोवेळी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी तक्रारी, निवेदन व मिडियाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. काही कर्मचारी या अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून उपोषणास देखील बसले होते. मागील काही दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण शस्रक्रिया झालेल्या महिलांना याच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या गलथान कारभारामुळे चक्क खाली फरशीवर झोपवण्यात आले होते. या प्रकारामुळे संतप्त रुग्णाच्या नातेवाईकांनी, लोकप्रतिनिधी यांनी या विरोधात आवाज उठवून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तरीदेखील डॉ टोपे यांच्या चीड आणणाऱ्या कृत्यावर पांघरून घातले गेले. डॉ टोपे हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपिडीला कधीच हजर नसतात. रुग्णांशी हुज्जत घालतात. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना इतरत्र पाठवतात. अश्या असंख्य तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल असून देखील आरोग्य विभाग डॉ रत्नदीप टोपे यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळेच डॉक्टर रत्नदीप टोपे यांची मुजोरी वाढली आहे कि काय. आशा, आरोग्य कर्मचारी यांना तीन -तीन तास उभे करून जानेवारी महिन्याचि आढावा मीटिंग घेण्यात आली. आरोग्य विभागाच्या इतिहासात असा प्रकार बहुदा पहिल्यांदाच घडला असावा. एवढ्यावरच न थांबता डॉ रत्नदीप टोपे यांनी जानेवारी 2026 (ज्या महिन्यात भारत प्रजासत्ताक झाला )चा जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत सर्वच कर्मचाऱ्यांचा पगार रोखून धरला. मागील दोन ते तीन दिवसात जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा झाले आहे. कर्मचारी काम करून देखील कर्मचाऱ्याचा पगार काढला जात नाही. आणि स्वत वैद्यकीय अधिकारी डॉ टोपे प्राथमिक आरोग्य केंद्रात कधी तरि येतात तरि त्यांच्या पगार वेळेवर कसा होतो असे प्रश्न कर्मचारी करत आहेत.

याच संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ रत्नदीप टोपे यांच्या मनमानी कारभारामुळे याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील माजी कर्मचाऱ्याचा गेल्या तेरा महिन्यापासून पगार झालेला नाही. हे कर्मचारी धरणग्रस्त असून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वेतणावरच अवलंबून आहे. एका धरणग्रस्त कर्मचाऱ्याचा पगार तेरा महिन्यापासून अदा न होणे हि बाब अत्यंत निंदनीय आहे.
तरी अश्या विकृत वृत्तीच्या अधिकाऱ्यावर आरोग्य विभागाने लवकर आवर घालून कारवाई करावी. ही नम्र विनंती.