करमाळ्यात विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर यशस्वी; ७१ दात्यांनी दिले जीवनदान

करमाळा, ४ फेब्रुवारी २०२६ : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे मा. श्री. विलासराव घुमरे सर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात एकूण ७१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून ‘रक्तदान हेच जीवनदान’ या उक्तीला सार्थ ठरवले.

राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी आणि यशवंत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचे उद्घाटन डॉ. विट्ठल पवार आणि डॉ. दयानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. डॉक्टर द्वयांनी रक्तदान हे जीवन दान आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. मिलिंद फंड (अध्यक्ष, विद्या विकास मंडळ) होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा. अँड. विक्रांत घुमरे आणि मा. श्री. आशुतोष घुमरे उपस्थित होते. आयोजक म्हणून प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच कनिष्ठ विभागाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. संभाजी किरदाक यांचीही विशेष उपस्थिती होती.

शिबिराची सुरुवात प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी स्वत: रक्तदान करून केली, ज्यामुळे इतर दात्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. रक्तदान करणाऱ्यांमध्ये विद्यार्थी, शिक्षक तसेच घुमरे सरांशी स्नेह असणाऱ्या समाजातील सर्व स्तरातील लोकांचा समावेश होता. या सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले. शिबिरात ‘रक्तदान म्हणजे जीवनदान’ हे घोषवाक्य अधोरेखित केले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी सर्वांचे आभार मानले असून, अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात जागृती निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले. भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी बोलून दाखवला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *