करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांची केम गट व पांडे गटात भव्य जाहीर प्रचार सभा होणार असून या सभेतून सत्तेविरुद्ध थेट तोफ डागली जाणार असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.

करमाळा तालुक्यातील केम गट व पांडे गटात प्रहार जनशक्ती पक्षाने 3 उमेदवार उभे केले आहेत.

केम गटातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उज्वला संदीप तळेकर, साडे गणातून पंचायत समिती सदस्य पदासाठी राजेंद्र बंडगर, तर पांडे गटातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी दिपाली ढवळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

या निवडणुकीत एकीकडे महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे करमाळा तालुका विकास आघाडी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहे. अशा परिस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाने अनेक छोट्या-मोठ्या चळवळीतील पक्ष व संघटनांना सोबत घेऊन सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी, ऊस, केळी, कांदा व इतर फळबाग पिकांना योग्य हमीभाव, दिव्यांग बांधवांचे प्रश्न, शेतमालाला न्याय्य दर, वंचित-गरिबांना रोजगार, महिला सक्षमीकरण यांसाठी सातत्याने संघर्ष सुरू आहे. तसेच प्रत्येक गावातील रस्ते, पाणी, वीज, शाळा, प्रशासकीय कार्यालयातील सामान्यांची रखडलेली कामे, समाजकल्याण विभागाच्या योजना थेट लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन प्रहार निवडणूक रिंगणात उतरला आहे.

या पार्श्वभूमीवर बच्चू भाऊ कडू हे जाहीर सभेत सत्ताधारी पक्षांना कोणत्या शब्दांत धारेवर धरणार, शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काय ठोस भूमिका मांडणार, याकडे करमाळा तालुक्यातील शेतकरी, कामगार, युवक व सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या या आक्रमक भूमिकेमुळे करमाळा तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून, सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे, असे चित्र सध्या दिसून येत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *