करमाळा प्रतिनिधी

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक–२०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाजात नेमणूक होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत न्याय्य व संवेदनशील धोरण राबवावे या मागणीसाठी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी, तहसील करमाळा यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात प्रामुख्याने केंद्राध्यक्ष (Presiding Officer) म्हणून कर्मचाऱ्यांची निवड करताना Pay Scale (वेतनश्रेणी) नुसारच नेमणूक करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. समान वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांना समान जबाबदारी देण्यात यावी, जेणेकरून निवडणूक कामकाजात कोणताही अन्याय किंवा असमतोल निर्माण होणार नाही, असे समितीने स्पष्ट केले.

तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना अनेक कर्मचाऱ्यांना शारीरिक, मानसिक तसेच कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करून महिला कर्मचारी, दुर्धर आजाराने त्रस्त असलेले कर्मचारी, BLO (Booth Level Officer) म्हणून कार्यरत कर्मचारी, तसेच ५५ वर्षांवरील वयाचे कर्मचारी यांना निवडणूक कामकाजातून वगळण्यात यावे अशी महत्त्वपूर्ण मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आले की, निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असली तरी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा, सुरक्षिततेचा व सामाजिक जबाबदाऱ्यांचा विचार होणे तितकेच आवश्यक आहे. योग्य नियोजन व न्याय्य नेमणुकीमुळेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व तणावमुक्त पार पडू शकते.

या वेळी शिक्षक नेते हनुमंत सरडे, चंद्रहास चोरमले, राजकुमार खाडे, तात्यासाहेब जाधव, प्रमोद काळे, अजित कणसे आणि महेश निकत आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित शिक्षक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे व योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या या निवेदनामुळे निवडणूक कामकाजात कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत आणि त्यांच्या कल्याणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *