करमाळा प्रतिनिधी

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी २०२६ यादरम्यान सातारा या ठिकाणी पार पडले. या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा, शाहूपुरी सातारा आणि मावळा फाउंडेशन सातारा यांना मिळालेला होता. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक, लेखक विश्वास पाटील हे होते. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या “कवी कट्टा” या काव्य मंचासाठी कविता निवड समिती मार्फत कविता मागवण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये करमाळा येथील कवयित्री सौ प्रणिता रवींद्र काटुळे यांच्या “तू होशील माझी” या कवितेची निवड समितीमार्फत निवड झाली होती. त्यांनी सादर केलेल्या या कवितेस प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींसाठी हे फार मोठे व्यासपीठ होते.

या कवी कट्ट्याचे प्रमुख म्हणून प्रसिद्ध कवी राजन लाखे यांनी उत्तम जबाबदारी पार पाडली. त्यांनी उत्तमरीत्या सूत्रसंचालनही केले. या कवी कट्ट्यातील हे चौथे पुष्प प्रसिद्ध कवी बा.सी. मर्ढेकर यांना समर्पित केले होते. काव्याविषयी आवड असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांनी सभागृह खचाखच भरले होते. या सदरात सादर झालेल्या कवितांना प्रेक्षकही तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते. त्यामुळे सगळे वातावरण काव्यमय झाले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *