
करमाळा प्रतिनिधी
रिटेवाडी उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील हे कटिबद्ध असल्याचे युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
कोर्टी-हुलगेवाडी येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोर्टी हुलगेवाडी येथील वस्ती नजीकच्या मुख्य रस्त्यावर एका पुलाची मागणी गेल्या पन्नास वर्षांपासून केली जात आहे. परंतु युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्याकडे येथील शेतकऱ्यांनी गावभेट दौऱ्यात या कामाविषयी गरज व महत्व सांगितले असता पृथ्वीराज पाटील यांनी तातडीने याची दखल घेऊन आमदार नारायण आबा पाटील यांच्या कानावर ही गोष सांगितली. तसेच कोर्टी हुलगेवाडी येथील शेतकरी प्रत्यक्ष आमदार नारायण आबा पाटील यांच्या भेटीस आले व त्यांनी या कामास निधी मिळावा म्हणून मागणी केली असता आमदार नारायण आबा पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून अर्थात आमदार फंडातून या कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिला.

यानंतर आज या कामाची सुरुवात केली गेली. यावेळी युवानेते पृथ्वीराज पाटील, मा.जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले, पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर, माजी उपसभापती संजय जाधव, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती जालिंदर पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे डॉ. अमोल दुरंदे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, तालूक्याच्या उजनी बॅक वॉटर व दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांप्रमाणेच तालुक्यातील या उत्तर भागात रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून भीमेचे पाणी शेताच्या पाटात आले पाहिजे हे आमदार नारायण आबा पाटील यांचे स्वप्न आहे. यातुन नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची संकल्पना पुढे आली व आज आमदार नारायण आबा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्टी व परिसरातील नागरिकांच्या सिंचनाच्या प्रश्ना बरोबरच दळणवळण, शिक्षण, आरोग्य सुविधा आदि प्रश्नासाठी आपण स्वतः लक्ष देणार असुन आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या भागाच्या विकासास प्राधान्य देणार असल्याचे ठाम आश्वासन पृथ्वीराज पाटील यांनी दिले. यावेळी माजी उपसभापती संजय जाधव, डॉ. अमोल दुरंदे व पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनीही विचार मांडले. कार्यक्रमास कोर्टी व हुलगेवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.