करमाळा प्रतिनिधी

“आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो” या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री. शाहू शिक्षक आघाडी, कागल (ता. कागल, जि. कोल्हापूर) यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. अलीकडील पावसामुळे करमाळा तालुक्यातील अनेक भागांना पूरस्थितीचा फटका बसला असून, याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शाहू शिक्षक आघाडीने पुढाकार घेत थेट विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवली.

या उपक्रमांतर्गत करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण सहा शाळांमधील सुमारे १५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेवाडी, दिलमेश्वर, लावंडवस्ती, नीळवस्ती, फरतडे वस्ती तसेच तळेकर वस्ती नं. २ येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. वही, पेन, पेन्सिल, इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य असलेल्या या किटमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पुन्हा गती मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून श्री. शाहू शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील शिक्षकांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. साहित्य वाटप होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. या प्रसंगी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यातही तालुक्यातील शाळा, विद्यार्थी किंवा शिक्षकांना कोणत्याही अडचणी आल्यास मदतीसाठी नेहमी पुढे राहू, असा विश्वास दिला.

या कार्यक्रमास श्री. शाहू शिक्षक आघाडीचे मान्यवर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये बाळासाहेब निंबाळकर (माजी चेअरमन व विद्यमान संचालक, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक), सुनील पाटील सर (माजी चेअरमन, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी कोल्हापूर व जिल्हा सरचिटणीस शिक्षक संघ, थोरात गट), के. डी. पाटील सर, संजय दाभाडे सर, जितेंद्र कुंभार सर (चेअरमन, सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतसंस्था), तसेच सर पिराजीराव पतसंस्थेचे संचालक प्रदीप बुधाळे सर, बाळासाहेब तांबेकर सर, बाळू खामकर सर, पी. आर. पाटील सर, हरिश्चंद्र साळुंखे सर, ए. एल. कांबळे सर, विठ्ठल पाटील सर यांचा समावेश होता.

याशिवाय करमाळा तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले, केंद्रप्रमुख संजय मुंढे, सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा नेते तात्यासाहेब जाधव सर, करमाळा तालुका जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष अरुण चौगुले सर, करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सचिव अजित कणसे सर, बलभीम बनसोडे सर, नितीन काळे सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

श्री. शाहू शिक्षक आघाडी कागल यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून, अशा उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *