करमाळा प्रतिनिधी

शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार शहाजी बापू पाटील, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश नाना साठे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा नगरपालिका धनुष्यबाणावर सर्व जागा स्वबळावर लढवणार असून करमाळा नगरपालिकेवर भगवा फडकणारच असा विश्वास माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख अनिल पाटील, शहरप्रमुख संजय शीलवंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, उपतालुकाप्रमुख गौतम रोडे, तालुका समन्वयक राहुल कानगुडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वैभवराजे जगताप म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिक देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करमाळा तालुक्यातील जनतेने जगताप कुटुंबावर कायमस्वरूपी प्रेम केले आहे. शिवसेना माजी आमदार जयवंतराव जगताप यांना मानणारा मोठा मतदार असून अठरापगड जातीला बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून जयवंतराव जगताप यांच्या पाठीशी मुस्लिम समाज व दलित समाज शंभर टक्के उभा राहतो हा इतिहास आहे. एकनाथ शिंदेंच्या रूपाने महाराष्ट्राला एक संवेदनशील व आशादायक नेतृत्व मिळाले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक कामाला लागले असून मोठ्या ताकतीने ह्या सगळ्या निवडणुका जिंकून करमाळा नगरपालिकेची उर्वरित विकासाची कामे मार्गी लावणार आहोत. करमाळा नगरपालिकेतील वीस जागेसाठी जवळपास शंभर ते दीडशे कार्यकर्ते धनुष्यबाणावर  निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून नगराध्यक्ष पदासाठी सहा ते सात उमेदवार शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची इच्छुक आहेत. करमाळा शहरातील 20 वार्डात शिवसेनेची भक्कम शाखा बांधणी केली असून तालुक्यातील 118 गावात संघटन तयार केले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व निवडणुका धनुष्यबाण चिन्हावरच एकतर्फी लढविण्यात येणार असून लवकरच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या आधी शिवसैनिकांचा मेळावा घेणार असल्याचे वैभव राजे जगताप यांनी शेवटी सांगितले.

……………………

शिवसेनेत काम करणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला व जनतेची सेवा करण्याची प्रामाणिक तळमळ असलेल्यांनाच  उमेदवारी देणार असल्याचे धोरण शिवसेना माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे असून निश्चितच नगरपालिका जिंकणारच असा विश्वास माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी व्यक्त केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *