
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर दोन या शाळेत विद्यार्थ्यांनी तब्बल २६१३ सीडबॉल बनवले आहेत.
विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी सातत्याने आग्रह धरणाऱ्या या शाळेत मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी आपले सहकारी किरण जोगदंड यांच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे विद्यार्थ्यांनी हे २६१३ सीड बॉल बनवले आहेत.
पहिली ते चौथी वर्ग असणाऱ्या या शाळेत दोनच शिक्षक असताना देखील या शाळेने आजपर्यंत अनेक नवनवीन उपक्रम राबवून सर्वांगीण शिक्षणाचा ध्यास धरलेला आहे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शेतातून माती गोळा केल्याने लाल माती, पांढरी माती, गाळाची माती, काळी माती, मुरमाड माती, रेताड माती असे मातीचे विविध नमुने, त्यांची वैशिष्ट्ये देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवले जे विद्यार्थी कधीच विसरू शकत नाहीत.

हे सीडबॉल बनवताना करंज, शेवगा, हादगा, बहावा, चिंच, जांभूळ, पेरू अशा विविध देशी वनस्पतींच्याच बियांचा वापर करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरोघरी असे सीडबॉल बनवण्याचे आवाहन केले, हे सीड बॉल रिकाम्या जागेवर फेकल्यानंतर भविष्यात त्यातून अंकुर फुटतील आणि पर्यावरणामध्ये झाडांची संख्या वाढेल. शिवाय हा उपक्रम राबवताना विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी देखील प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांना आणखी प्रोत्साहन मिळाले. यातून पर्यावरणामध्ये झाडांची संख्या तर वाढेलच शिवाय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपली माती, आपली भारतभूमी याविषयी देखील आत्मियता आणि अभिमान वाढण्यास मदत होईल त्यामुळे प्रत्येकाने असे सीडबॉल बनवले पाहिजेत असे मत मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी व्यक्त केले.
हे सीडबॉल विद्यार्थी तसेच शिक्षक प्रवासाच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी टाकणार आहेत.
शाळेमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत हा उपक्रम राबविल्याबद्दल करमाळ्याचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, शिक्षण विस्तार अधिकारी जगताप मॅडम, नितीन कदम, मिनीनाथ टकले, केंद्रप्रमुख महावीर गोरे, सरपंच सुवर्णाताई मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष झेंडे व सर्व सदस्य तसेच गावातील समस्त शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे, उपशिक्षक किरण जोगदंड आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.