करमाळा प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशीलतेचा व समाजाभिमुख कार्याचा गौरव करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘स्व. सुखदेव साखरे आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचा’ पहिला मान यावर्षी जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास पांढरे यांना मिळाला आहे.

श्री राजेश्वर विद्यालय, राजुरी (ता. करमाळा) चे पहिले मुख्याध्यापक असलेले स्व. सुखदेव साखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे. यावर्षी प्रथमच हा पुरस्कार जाहीर झाला असून प्राचार्य पांढरे यांचा त्यात सन्मान होणार आहे.

प्राचार्य पांढरे यांचे कार्य : 28 वर्षांच्या सेवेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमशील कार्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेऊन त्यांचे पुनुर्वसन केले, क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडवण्यात मोलाचा वाटा, सामाजिक उपक्रमांत सातत्याने आघाडी व प्रेरणादायी कार्य,.

हा पुरस्कार शुक्रवार 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता स्व. साखरे सरांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष तानाजी माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून राजुरीचे सुपुत्र ह.भ.प. एकनाथ महाराज हंडे (राजुरीकर) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप : सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व रु. 11,000/- रोख रक्कम

या पुरस्कारासाठी कोणतेही अर्ज अथवा प्रस्ताव मागविले गेले नाहीत तर स्व. साखरे सरांचे माजी विद्यार्थी – प्रा. डॉ. संजय चौधरी, कृषी अधिकारी देविदास सारंगकर, विक्रीकर अधिकारी तुकाराम जाधव, उद्योजक प्रवीण साखरे, स्टडी सर्कलचे संचालक सतीश मोरे, धनंजय साखरे आदींच्या समितीने सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांमधून शोध घेऊन प्राचार्य पांढरे यांची निवड केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *