करमाळा प्रतिनिधी  

पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथे ‘राखी फॉर नेशन’ हा राष्ट्रभक्तीने प्रेरित उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयातर्फे जवानांप्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याच्या उद्देशाने शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःहून तयार केलेल्या राख्या आज थेट सीमारेषेवरील वीर जवानांसाठी पाठवण्यात आल्या.

या कार्यक्रमाला माजी सैनिक अशोक शिंदे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार राजेश गायकवाड, दिनेश मडके, नरेंद्रसिंह ठाकूर तसेच तुषार जाधव यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमावेळी पत्रकार बांधवांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांविषयी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी ही भावना म्हणजेच शिक्षणाचा खरा उद्देश आहे. ‘राखी फॉर नेशन’ सारखे उपक्रम केवळ सामाजिक जाणीव नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची प्रेरणा जागवणारे असतात.”

त्यांनी शाळेच्या पुढाकाराचे व कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करत असे उपक्रम ग्रामीण भागात घडत असल्यानेच शिक्षण क्षेत्रात खऱ्या अर्थाने बदल घडतो, असे गौरवोद्गार काढले. यावेळी माजी सैनिक अशोक शिंदे यांनी आपल्या अनुभवातून बोलताना सैनिकांच्या कठीण जीवनाची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.

शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते जमा केलेल्या राख्या सीमेवरील जवानांसाठी कृतज्ञतेच्या आणि प्रेमाच्या संदेशासह सुपूर्द करण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक विजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब सरडे, किरण परदेशी, हनुमंत रासकर, प्रताप बरडे, विलास पाटील, विशाल राठोड, रमेश मोरे, सुहास कानगुडे, सुरेश बरडे, दादा कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *