
करमाळा प्रतिनिधी
न्यु इरा पब्लिक स्कूल & ज्युनियर कॉलेज चिखलठाण मधील सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्रितपणे येऊन बालदिंडी काढली होती. विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे व संदेश देणारे फलक घेतले होते. झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव, निसर्गाचे संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलनाचे संदेश देणारे फलक होते.

विद्यार्थ्यांनी अभंग, भारुड, संतांची माहिती, गोल रिंगण, पारंपरिक फुगडी सादर केली.
विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई, मुक्ताई, जनाबाई, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ, गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या होत्या. वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषा करून स्कूल मध्ये दिंडी काढण्यात आली होती. शिवदीप हनुमंत बोराडे (इयत्ता 5 वी) आणि शिवण्या बाळू मत्रे (इयत्ता 4 थी) यांनी विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख परिधान केला होता. यावेळी भक्त पुंडलिक यावर आधारित नाटक विद्यार्थ्यानी सादर केले.

यावेळच्या दिंडीचे वैशिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेले भव्य रिंगण सोहळा होय. यामधे तुळशीवृंदावन घेतलेल्या मुली, टाळ घातलेली मुले आणि भगवा पताका खांद्यावर घेऊन विद्यार्थ्यांनी भव्य रिंगण सोहळा पार पाडला. या बालगोपाळाच्यां रिंगण सोहळयाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

यावेळी चिखलठाण येथील दाम्पत्य बन्सी संभाजी बारकुंड व लक्ष्मी बन्सी बारकुंड यांच्या हस्ते श्री विठठलाच्या व रुक्मिणी मातेच्या मूर्तींची पूजा करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व ड्रायव्हर बंधू आदिंनी अथक परिश्रम घेतले.