
करमाळा प्रतिनिधी
विज्ञानाला जिज्ञासेची, स्त्रीशक्तीला सन्मानाची आणि समाजसेवेला कृतज्ञतेची जोड देत यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे यांच्या वतीने यशकल्याणी सेवाभवन येथे आयोजित ‘पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पारितोषिक व केतकी हिम्मतराव शिंदे समाजदीप पुरस्कार सोहळा–२०२६’ उत्साहात संपन्न झाला.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद देशमुख यांनी विज्ञान प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून समाजातील प्रश्नांना विवेकपूर्ण आणि व्यावहारिक उत्तरे शोधण्याची दृष्टी असल्याचे सांगत बालवयापासून जिज्ञासा आणि संशोधक वृत्ती विकसित करण्याचे आवाहन केले. वीरमाता अनुजा अरविंद निलंगे यांनी समाजाकडून मिळालेल्या संधींची परतफेड सेवाभावातून व्हावी, असे सांगत सहयोगी संस्थांच्या योगदानाचे कौतुक केले.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे यशकल्याणी संस्थेच्या विश्वस्त व देणगीदार डॉ. प्रचिती पुंडे यांच्या सामाजिक-शैक्षणिक योगदानाच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने दरवर्षी युवा संशोधक व संशोधन संस्थांना एकूण ५० हजार रुपयांची संशोधन पारितोषिके देण्याची करण्यात आलेली घोषणा. ग्रामीण भागातील गुणवंत संशोधकांना संधी, मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यास ते देशाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतात, असा विश्वास डॉ. पुंडे यांनी व्यक्त केला.
नावीन्यपूर्ण प्रयोग सादर करणाऱ्या ३६ बालवैज्ञानिकांना ‘पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पारितोषिक’ देऊन सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. महिला सक्षमीकरणातील कार्याबद्दल निशिगंधा शेंडे यांच्या ‘सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान’ला ‘वीरमाता अनुजा अरविंद निलंगे समाजऋण पुरस्कार’ रोख २५ हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्हासह प्रदान करण्यात आला.
शारदाताई देवी आणि प्रा. मेघाली शेटे यांना ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’, तर डॉ. हेमा शिराळ, हिरा केशवराव वीर, डॉ. स्वाती पाटील, डॉ. निशा सारंगकर, चंद्रकला मारकड, प्रा. संध्या शिंदे, मनीषा काळे, प्रियांका जाधव, ॲड. मधुरा चांदणे, डॉ. सायुज्जा पुंडे आणि प्रांजली लावंड यांना ‘केतकी हिम्मतराव शिंदे समाजदीप पुरस्कार–२०२६’ प्रदान करण्यात आला. संबंधित पुरस्कारार्थींना रोख ५ हजार रुपये रक्कम, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविकात प्रा. गणेश करे-पाटील यांनी, “सन्मान ही केवळ कार्याची पोचपावती नसून भविष्यात अधिक जबाबदारीने समाजासाठी काम करण्यासाठी व्यक्त केलेला विश्वास आहे. गुणवत्तेला प्रोत्साहन, कर्तृत्वाला व्यासपीठ आणि सेवेला कृतज्ञतेची जोड देणे हीच यशकल्याणीची भूमिका आहे,” असे स्पष्ट केले. अध्यक्ष संपतराव (भारतभाऊ) शिंदे-पाटील यांनी ग्रामीण गुणवत्तेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे असे उपक्रम सकारात्मक समाजनिर्मितीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले.
सोहळ्यास उद्योजक हिम्मतराव शिंदे, सुनीता देवी, रेवन्नाथ आदलिंग, प्राचार्य बाळासाहेब नरारे, भास्करराव मोढळे, प्रा.बाळकृष्ण लावंड, कल्याणराव साळुंके, प्रा.जयेश पवार, प्रा. प्रेरणा जाधव, विशाल परदेशी यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले, तर प्रा. संध्या शिंदे-थोरे यांनी आभार मानले.