डिकसळ पुलाच्या कामाबाबत आमदार नारायण आबा पाटील एक पाऊल पुढे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या डिकसळ पुलाचे काम चालू आहे. या कामाच्या संथगतीने होण्याबाबत स्वतः आमदार नारायण आबा पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारना केली. यानंतर मात्र आता कार्यतत्पर होऊन आमदार नारायण आबा पाटील यांनी काम वेगाने कसे होईल याकडे लक्ष‌ दिले आहे. याबाबत सविस्तर बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की गेल्या सोळा महिन्यांपासून डिकसळ पुलाचे काम चालू आहे. पण अद्याप पर्यंत केवळ सोळा टक्के काम सुध्दा पुर्ण झाले नाही. एकीकडे जून्या डिकसळ पुलावरुन दळणवळणासाठी प्रतिबंध असल्याने या नवीन पुलाचे काम वेगाने व वेळेत पुर्ण होणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता उजनी पाणीपातळीच्या खालील कामास अनेक अडचणी येत आहेत. तसेच पावसाळ्यात व उजनी पाणी पातळी वाढल्यास काम बंद राहते. जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करुन सध्या काम चालू असल्याने या अडचणी निर्माण होतात. यामुळे एकंदरीत या कामावर याचा परिणाम होत आहे. भविष्यात शेकडो वर्षे हा पुल टिकला जावा म्हणुन आता या पुलाचे काम करत असताना नवीन तंत्रज्ञान वापरने अत्यावश्यक आहे. नाशिक अथवा राज्यातील इतर ठिकाणी पाण्यात बांधकाम करत असताना नवीन तंत्रज्ञान वापरले जाते तर मग करमाळा तालुक्यातील डिकसळ पुलासाठी का वापरले जात नाही हा प्रश्न आता आपण तडीस नेणार आहोत. संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांना भेटून आपण नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी करणार आहोतच. पण वेळ पडल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा आपण सभागृहाच्या पटलावर लेखी स्वरूपात तसेच प्रत्यक्ष बोलून मांडण्यासाठी प्रयत्नशील आहोत.डिकसळ पुलाच्या उर्वरित कामाचा आढावा घेतला असून नवीन तंत्रज्ञान वापरताना जर संबंधित कामाच्या आर्थिक तरतुदींमध्ये वाढ करावी लागत असेल तर तशीही मागणी आपण शासनाकडे करणार आहोत असे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. तर या कामाबाबत आमदार नारायण आबा पाटील यांनी कालच संबंधित विभागाच्या मंत्रीमहोदय राज्य सचिव यांना लेखी निवेदन पाठवले असून डिकसळ पुलाच्या कामाबाबत मंत्रालयीन पातळीवर एका बैठकीचे आयोजन करण्यात यावे म्हणुन ते आग्रही असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *