
करमाळा प्रतिनिधी
वीज वितरण कंपनी पाणीपुरवठा विभाग व भूमी अभिलेख प्रश्नावर आम सभेत उपस्थित नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार संबंधित अधिकाऱ्यावर केल्याने आजची आमसभा गाजली. आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार नारायण पाटील होते.

करमाळा येथील कर्जत रोडवरील धर्मसंगीत मंगल कार्यालयात तब्बल साडेसहा तास आमसभा झाली. आमसभेच्या व्यासपीठावर तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. कदम, पोलिस निरीक्षक रणजित माने, जि. प. च्या माजी सदस्य सवितादेवीराजे भोसले, आदिनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, संचालक देवानंद बागल, राहुल सावंत, चंद्रसेन ननवरे, राजेंद्रसिंह राजेभोसले, अजित तळेकर, राजाभाऊ कदम, सुनील सावंत, संतोष वारे आदी पदाधिकाऱ्यासह वीज वितरण, भूमी अभिलेख, कृषी, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, सहकार, नगरपरिषद, एस. टी., ग्रामीण पाणीपुरवठा आदी विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

आमसभेच्या समारोपप्रसंगी आमदार नारायण पाटील यांनी दहीगाव सिंचन योजनेच्या उजनी येथील पंपगृहाचे पाणी उचलण्याची पाणी पातळीची उंची ४९० मीटर आहे. त्यामुळे तालुक्याला हक्काचे पाणी मिळत नाही. तेव्हा सिना बोगदा, मराठवाड्यासाठी जाणाऱ्या बोगद्याची उंची दहीगाव सिंचन योजनेपेक्षा खाली असल्याने दहीगाव योजना लवकर बंद होते. तरी दहीगाव सिंचन योजनेची पाणी उचलण्याची पातळी ४८५ मीटर करण्यात यावी असा ठराव मांडला त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात संमत केला.
करमाळा तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून आमसभा झाली नसल्याने आयोजित नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत तब्बल २०० लेखी प्रश्नांसह आयत्या वेळेस अनेक प्रश्न अधिकाऱ्यांना विचारले. यामध्ये वीज वितरण कंपनीच्या वीज बिल माफी, कमी दाबाने वीजपुरवठा, प्रलंबित शेती पंपाचे वीज कनेक्शन, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती आदी प्रश्नांचा भडिमार प्रा. चौधरी यांनी केला.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित जलजीवन मिशन योजनेच्या कामांमधील अनियमितता प्रश्नावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता शेख यांनी बेजबाबदारपणे उत्तरे दिल्याने आ. नारायण पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आमसभेत उपअभियंता शेख यांच्या निलंबनाचा ठराव करण्याच्या सूचना केल्या.
भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीची प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा सूर समेत उमटला. त्याशिवाय भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर पर्याय म्हणून कार्यालयात हालचाल रजिस्टर व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी अनेकांनी केली. करमाळा एस.टी. आगारातील जुन्या बसेस, अस्वच्छता संदर्भात मनसेचे संजय घोलप, चंद्रकांत पवार आदींनी तक्रारी केल्या.
करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे. शहरात सर्वत्र अतिक्रमण झालेले असताना एकाच ठिकाणच्या अतिक्रमणाकडे लक्ष देत असल्याचा आरोप सुनील सावंत, चंद्रकांत पवार, बबनराव चांदगुडे यांनी केला. सूत्रसंचालन सुनील तळेकर यांनी केले.