करमाळा प्रतिनिधी

शेलगाव वांगी येथे केळी संशोधन केंद्र सुरू करणेचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी पुढाकार घेतला असून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचेकडे याविषयी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील फळ पिकापैकी केळी हे एक प्रमुख फळ पिक आहे. मागील काही वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस इ. तालुक्यात केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. सद्या सोलापूर जिल्ह्यात केळी लागवडीखाली ३२७०० हेक्टर क्षेत्र आहे. या भागातील केळी उत्पादक शेतकरी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जेदार केळीचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक केळीची निर्यात प्रामुख्याने या तीन तालुक्यातून होत आहे.

शेलगाव (वांगी), ता. करमाळा येथे कृषी विद्यापीठाची सुमारे ५० एकर जमिन उपलब्ध असल्याने या ठिकाणी केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचेमार्फत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (MCAER) पुणे यांना सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्तावास कृषी शिक्षण व संशोधन परीषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तरी शेलगाव (वांगी), ता. करमाळा येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्याची बैठक आयोजित करण्यात यावी असे पत्र दिले आहे त्यामुळे केळी संशोधन केंद्र होण्याचा मार्ग खुला होणार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *