
करमाळा प्रतिनिधी
दिनांक 24 Dec 2024 रोजी रावगाव ता.करमाळा जि.करमाळा येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले रायगडावर गेली होती. मुळात सहल म्हटलं किती फक्त मजा करण्यासाठी, आनंदासाठी, धमाल, मौज-मस्ती करण्यासाठी असते, पण असं म्हणतात एखादी गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवली ती गोष्ट विद्यार्थी मन लावून करतात, पण इथे या विद्यार्थ्यांनी किल्ले रायगडाला फक्त भेट दिली नाही तर एक नाविन्यपूर्ण उपक्रमही केला.

छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त विद्यार्थ्यांना दाखवायचा नाही, शिकवायचं नाही तर अनुभवायचा हाच हेतू ठेवून या सहलीचा आयोजन शाळेचे मुख्याध्यापक विजय कोळेकर सर आणि सहल प्रमुख शिक्षक भाऊसाहेब सरडे सर, हनुमंत रासकर सर, प्रताप बरडे सर, अंजली लांडगे मॅडम, पाटील सर, राठोड सर, कानगुडे सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सुरेश (अण्णा) बरडे आदींनी केले होते.

आज शिवरायांचे विचार कृतीत उतरायचे म्हटल्यावर तलवारीने युद्ध करून चालणार नाही उलट आजच्या काळाची गरज आहे ती, महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी प्राणपणाने लढलेल्या किल्ल्यांच्या संरक्षण व संवर्धन करण्याची ! भविष्यात येणाऱ्या पिढीला महाराजांचा इतिहास खरा होता हे दाखवायला पुरावे तर शिल्लक राहिले पाहिजे ! नाहीतर राम भारतात जन्माला आले होते काय ? यावर वाद करणारी लोक उद्या छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले होते काय ? हा प्रश्न नक्की विचारतील आणि त्या दिवशी त्यांचा इतिहास समजून सांगायला, तो दाखवायला, हेच गडकोट किल्ले आपल्याला मदत करणार आहेत. एक राम सेतू आम्हाला श्रीराम असल्याची अनुभूती आणि खात्री करून देतो. तसेच महाराजांचे साडेतीनशे पेक्षा अधिक किल्ले छत्रपती शिवराय नावाचं वादळ या महाराष्ट्रात येऊन गेलं हे दाखवायला पुरेसे होतील. हाच हेतू ठेवून विद्यार्थ्यांनी नुसती दुर्ग फेरी किंवा दुर्ग भेटीचा आनंद घेतला नाही तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता सुद्धा केली. आपल्या कृतीतून हे दाखवून दिलं की हो यापुढे किल्ला फक्त बघायला जायचं नाही तर त्याची स्वच्छता आणि संवर्धन करायची. ते सुद्धा सहलीचा एक भाग म्हणूनच हा एक नवा आदर्श पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपल्यासमोर घालून दिला म्हणून सर्व शिक्षकांचे विशेष आभार आणि कौतुक..!