करमाळा प्रतिनिधी

वडशिवणे येथील डॉक्टर भगवंत गणेश पवार यांच्या एमबीबीएसच्या फायनल परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये पार पडल्या असून त्याचा रिझल्ट 19 डिसेंबर रोजी आलेला आहे. फायनल परीक्षेमध्ये डॉक्टर भगवंत यांनी सर्व विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळवत जनरल सर्जरी विषयांमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. डॉक्टर भगवंत पवार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण

वडशिवणे तालुका करमाळा येथे मराठी माध्यमातून झाले असून गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या स्थापनेपासूनचे ते पहिले डॉक्टर विद्यार्थी ठरले आहेत. दहावी मध्ये त्यांनी 95.20% गुण मिळवले आहेत. अकरावी व बारावी सायन्स सोनवणे कॉलेज उक्कडगाव येथे झाले आहे. बारावी बोर्ड मध्ये 91.23% गुण मिळवून त्यानंतर वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट

2020 मध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये 645 गुण मिळवून ते एम्स हैदराबाद या ठिकाणी प्रवेश पात्र ठरले. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात तीन गोल्ड मेडल मिळवले. दुसऱ्या वर्षी ब्राँझ मेडल मिळवत शेवटच्या फायनल परीक्षेमध्ये सर्व विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळवत जनरल सर्जरी या विषयांमध्ये गोल्ड मेडलचे मानकरी ठरले. वैद्यकीय शिक्षण चालू असताना मध्यंतरी वेल्लोर (तामिळनाडू), चेंगलपट्टू (तामिळनाडू), एम्स भोपाळ (मध्य प्रदेश), एम्स भुवनेश्वर (ओरिसा), कानपूर (उत्तर प्रदेश) या पाच ठिकाणी कॉलेजतर्फे स्पर्धेसाठी उपस्थित राहून प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले. नोव्हेंबर 2024 मध्ये कानपूर येथे बालरोग शास्त्र (पीडियाट्रिक्स) या विषयात पाच राज्यांच्या झोनलमधून ते प्रथम आलेले आहेत. शैक्षणिक दृष्ट्या मागास अशा वडशिवणे सारख्या छोट्याशा गावामध्ये मराठी माध्यमातून शिक्षण घेत उच्च प्रतीचे यश मिळवण्याचे काम भगवंत पवार यांनी केलेले आहे. विशेष म्हणजे गुणवत्ता असेल तर शिक्षणासाठी पैसा लागत नाही हे भगवंत यांनी दाखवून दिलेले आहे. त्यांच्या संपूर्ण एमबीबीएसच्या शिक्षणाची फी हॉस्टेलसह केवळ 5856 रुपये होती. त्यांना गुणवत्तेमुळे ओएनजीसी या केंद्र सरकारच्या कंपनीतर्फे प्रतिवर्ष 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली. त्यांचे एकूण शिक्षणच मोफत झाले. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल परिवार व मित्र कंपनीतर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला. भगवंत यांनी मिळवलेले यश निश्चितच ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून परिसरातील अनेक विद्यार्थी आज मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेत आहेत व भविष्यातही ते गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल परिसरातून त्याचे कौतुक होत असून सर्व परिसरामध्ये त्यांनी मिळवलेल्या यशाची चर्चा होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *