
करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.२ या शाळेत आगळीवेगळी अशी संविधान दिंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
संविधान अमृत महोत्सवी वर्षात शाळांमधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून घराघरापर्यंत संविधान पोहोचवण्यासाठी “घर घर संविधान” उपक्रमांतर्गत 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रम राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत संविधान दिनाचे औचित्य साधून खातगाव नं.२ शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांच्या संकल्पनेतून आणि सहशिक्षक किरण जोगदंड यांच्या सहकार्याने राबविलेल्या या आगळ्यावेगळ्या संविधान दिंडीत भारतीय संविधानाची सजवलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे पर्यावरण पूरक पद्धतीने सजवलेल्या या पालखीला सजवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर न करता झाडांच्या पानाफुलांचा वापर करण्यात आला होता.

या पालखीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, आदिवासी, कोळी असे वेगवेगळे पेहराव परिधान करून काढण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या राष्ट्रभक्तीपर संविधान दिंडीत मोठ्या डौलाने तिरंगा फडकवत हम सब एक है, घर घर – संविधान, आपले संविधान – आपला अभिमान, आपले संविधान – देशाची शान, संविधानाचा विजय असो, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला.

पालखीतून काढण्यात आलेली ही संविधान दिंडी थेट उजनी धरणासाठी असणाऱ्या मच्छीमारांच्या वस्त्यांमधून फिरली आणि भारताचे संविधान मच्छीमारांच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहोचवण्याचे काम या खातगाव नं. २ या शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केले.
आपल्याच घरातील लहान लहान मुलं या दिंडीचे पाईक आहेत हे पाहून या मच्छीमार कुटुंबातील महिलांनी सुद्धा संविधानाचे आणि दिंडी वाहणाऱ्या मुलांचे भक्ती भावाने पूजन केले आणि सगळे वातावरण राष्ट्रभक्तीमय आणि भावनिक निर्माण झाले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी या मच्छीमारांच्या वस्तीवरील सर्व नागरिकांना हे संविधान अर्थात आपल्या देशाची राज्यघटना दाखवून या भारत देशाचा नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील त्याचे अनमोल महत्त्व, त्याविषयीची आदर भावना याबाबत मार्गदर्शन केले.
या दिंडीमध्ये खातगावच्या सरपंच सुवर्णा मोरे, ग्रामपंचायत सदस्या कौशल्या रणसिंग, शा. व्य. स. अध्यक्ष संतोष झेंडे, सदस्या कोमल मोरे, हरिदास धायगुडे, कल्पना पांढरे, अंगणवाडी सेविका शालन आरदड, मदतनीस माधुरी कीर्ते, नौशाद शेख तसेच शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि सहशिक्षक किरण जोगदंड तसेच सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
राष्ट्रभक्ती आणि जनजागृती करणाऱ्या या संविधान दिंडीचे आयोजन केल्याबद्दल करमाळ्याचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे, शि.वि.अ.नितीन कदम, केंद्रप्रमुख महावीर गोरे, शाळेतील सर्व पालक तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि सहशिक्षक किरण जोगदंड यांचे विशेष कौतुक केले.