
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2 या शाळेतील विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जबाबदार नागरिक घडवण्याच्या दृष्टीने नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या या शाळेत वेगवेगळे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.

फटाक्यामुळे जरी क्षणिक आनंद भेटत असला तरी आपणच पैसे विनाकारण खर्च करतो, आणि त्यातून निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदूषण तर आणि कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. शिवाय आपल्या आजूबाजूला कचराही मोठ्या प्रमाणात निर्माण होतो.

पर्यावरणासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी हे घातक तर आहेच शिवाय लहान मुलं आणि वृद्ध माणसांना याचा खूप त्रास होतो. दिवाळी हा आनंदाचा सण आहे, यावेळी एकमेकांना मिठाईवाटप जरूर करा, पण आपल्या क्षणिक आनंदासाठी संबंध पर्यावरणाला घातक असे फटाके फोडू नयेत, आपल्याच गावातील पर्यायाने देशातील पर्यावरणावर घात करू नये, हीच खरी मानवतेची आणि देशाची देशसेवा असेल असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी विद्यार्थ्यांना केले.

फटाके फोडण्यासाठी जो खर्च करणार आहोत तो टाळून त्या बदल्यात आपण पुस्तके घ्यावीत किंवा समाजातील गरजूंना लागणारे आवश्यक साहित्य द्यावेत असे यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले आणि स्वतः अगोदर शाळेतील 10 गरजू विद्यार्थ्यांना कपडे वाटप केले आणि त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला.

शिक्षकांनी स्वतः अगोदर हा फटाके मुक्तीचा निर्धार केल्याने शाळेतील विद्यार्थ्यांनीही याला उत्साहाने प्रतिसाद देत आम्हीही फटाके वाजवणार नाहीत, या खर्चाऐवजी या पैशातून आम्ही पुस्तके घेऊ किंवा गरजूंना मदत करू असा निर्धार केला.
शाळेमध्ये राबविलेल्या या उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे, शि.वि.अ. नितीन कदम, केंद्रप्रमुख महावीर गोरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि किरण जोगदंड यांचे विशेष कौतुक केले.