करमाळा प्रतिनिधी
जातेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत मंजूर ५ लाख रु. निधीचे चालु असलेले पेव्हींग ब्लॉकचे काम स्थगित करणेबाबत गटविकास अधिकारी करमाळा यांना दलित संघाच्या वतीने निवेदन दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, जातेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत मंजूर निधी ५ लाख रुपयांमधून काम चालु असून पेव्हींग ब्लॉकचे काम समान वाटप समाजामध्ये न होता सरपंच यांनी आपल्या घरासमोरच सदरील काम चालु केलेले असून त्यांनी योजनेच्या निधीचा उपयोग इतर ठिकाणी न करता स्वतःचेच घरासमोर केलेला आहे. सदरील योजने अंतर्गत जातेगाव येथील दलित वस्तीमध्ये विकासकामे करणे गरजेचे असताना सरपंच हे वैयक्तिक हव्यासापोटी सदर योजनेचा निधी हा स्वतःचेच घरासमोर वापरत आहेत.
तरी सदरील योजनेच्या मंजूर निधीचा उपयोग सरपंच यांनी चुकीच्या पध्दतीने केलेला आहे. त्यामुळे सदर योजनेचा निधी दलित वस्तीमधीलच विकास कामांसाठी करणेबाबतच्या सुचना आपले स्तरावरुन सरपंच/ग्रामसेवक यांना करणेत याव्यात. तसे न केल्या दलित महासंघाच्या वतीने आपले कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल यांची आपण नोंद घ्यावी.