
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील गटातटाच्या राजकारणात पाटील, शिंदे, बागल असा सामना होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसलाही सर्व पर्याय खुले आहेत. करमाळा तालुक्यातील राजकारणाचा पायाच काँग्रेस असल्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षच हा निर्णायक ठरणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस (आय) पक्षाचे करमाळा

तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले. पुढे बोलताना जगताप म्हणाले की, अगोदरच्या काळात “करमाळ आणि पाण्यावाचून तरमाळ” असे या तालुक्याला संबोधले जायचे. पण स्व.देशभक्त नामदेवरावजी जगताप यांच्या अथक प्रयत्नातुन आणि दूरदृष्टी कोनातून करमाळा तालुक्यासाठी वरदायनी ठरलेल्या उजनी धरणामुळे करमाळा शहराचा कायमचा

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून तालुकाही सुजलाम सुफलाम झाला. त्याच बरोबर त्यांनी काँग्रेस पक्षाची पाने-मुळे संपूर्ण तालुक्यामध्ये रुजवलेली आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यामध्ये शहराबरोबर प्रत्येक गावामध्ये स्व. नामदेवरावजी जगताप यांच्यावर, काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. महाविकास आघाडीच्या इतर पक्षा पेक्षा सर्वात ज्यास्त काँग्रेस

पक्षाचे मतदार या करमाळा मतदार संघात असूनही महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षाला ही जागा सुटत नसल्याची खंत जगताप यांनी व्यक्त केली. परंतु प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आपण पोहचणार असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना अधिक सक्रिय करणार आहोत. आजपर्यंत करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निकालाचा जर विचार केला तर असे दिसून येते की,

करमाळा विधानसभा मतदारसंघाचा निकाल अवघ्या चार हजार ते पाच हजार मताधिक्याच्या आसपास पहावयास मिळतो. पाठीमागील काही दिवसांमध्येच काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आपण बैठक घेतलेली असून सर्वांना या निवडणुकीमध्ये सक्रिय होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना बोलावून लवकरच एक मोठा मेळावा करमाळा शहरांमध्ये आयोजित करण्याचा आपला मानस असल्याचे जगताप यांनी सांगितले.
