
करमाळा प्रतिनिधी
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यावतीने येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे दि. ०४ व ५ ऑक्टोबर रोजी आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातून २९ मुलांचे व १३ मुलींचे संघ सहभागी झाले होते. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच या स्पर्धा मॅट वर खेळविण्यात आल्या. या स्पर्धांच्या विजेत्या संघातून विद्यापीठाचा संघ निवडला जाणार आहे.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये मुलांच्या संघांमध्ये प्रथम क्रमांक शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर, द्वितीय क्रमांक संगमेश्वर स्वायत्त महाविद्यालय सोलापूर आणि तृतीय क्रमांक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते यांना मिळाले.

मुलींच्या संघांमध्ये प्रथम क्रमांक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते, द्वितीय क्रमांक गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला आणि तृतीय क्रमांक सांगोला महाविद्यालय, सांगोला यांना मिळाले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाच्या क्रीडा हॉलमध्ये संपन्न झाला. पारितोषिक वितरणासाठी विद्या विकास मंडळ संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी.पाटील सर, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, क्रीडा शिक्षक डॉ. अतुल लकडे व प्रा. राम काळे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून आलेले संघ व्यवस्थापक ही उपस्थित होते. या स्पर्धा पार पाडण्यासाठी नेमलेल्या पंचांनी निर्णय अचूक देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तसेच यशवंत परिवारातील सर्व सदस्य एन.सी.सी. व एन.एस.एस. च्या सर्व स्वयंसेवकांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.