करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.2 शाळा लोकमंगल समूहातर्फे आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आली.
सोलापूर येथील हिराचंद नेमचंद वाचनालय किर्लोस्कर सभागृह येथे लोकमंगल समूहाचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमांमध्ये माजी सहकारमंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख तसेच माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, शिक्षण तज्ञ एच.एन. जगताप आणि लोकमंगल समूहाचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या हस्ते खातगाव शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे तसेच सहशिक्षक किरण जोगदंड यांनी हा आदर्श शाळेचा पुरस्कार स्वीकारला.
लोकमंगल फाउंडेशन च्या निवड समितीने प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन शाळेतील सर्व उपक्रमांची माहिती घेतली होती. केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता या शिक्षणाचा जीवनाशी संबंध जोडणारी ही शाळा ही केवळ शाळा राहिली नसून ते एक पर्यटन केंद्र बनले आहे. इतकी ही शाळा आकर्षक आणि स्वच्छ, सुंदर, नीटनेटकी आहे असे गौरव उद्गार त्यावेळी या सर्व निवड समितीने काढले होते. अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन करून शाळेची निवड केली आहे असे मनोगत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एच.एन. जगताप आणि अरविंद जोशी यांनी व्यक्त केले.
पूर्ण जिल्ह्यातून या शाळेची निवड झाल्याबद्दल करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, शि.वि.अ. नितीन कदम, केंद्रप्रमुख महावीर गोरे, सरपंच सुवर्णा मोरे, अध्यक्ष संतोष झेंडे तसेच गावातील आजी माजी पदाधिकारी, समस्त पालकांनी आणि परिसरातील समस्त शिक्षणप्रेमी नागरिकांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि सहशिक्षक किरण जोगदंड यांचे कौतुक केले.