
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. 2 या शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या आणि त्या मोठ्या आत्मीयतेने सीमेवरील सैनिकांना पाठवल्या आहेत.
रक्षाबंधन हा बहिण भावाच्या नात्याचा एक पवित्र सण. या सणानिमित्त बहिण भावाला राखी बांधते. पण आजकाल वापरल्या जाणाऱ्या बहुतेक राख्यांमध्ये प्लास्टिकचा वापर केलेला असतो. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक हानिकारक आहे. त्यामुळे प्लॅस्टिकचा कसलाही वापर न करता पूर्णपणे पर्यावरणपूरक अशा राख्या बनविण्याचे नियोजन मुख्याध्यापक

बाळासाहेब बोडखे यांनी केले. यांनी सहशिक्षक किरण जोगदंड यांच्या मदतीने इको फ्रेंडली राख्या तयार करण्याचा उपक्रम राबविला. यामध्ये विद्यार्थ्यांनी लोकर, रंगीत धागे, वापरलेल्या वह्यांचे पुठ्ठे, गुलमोहर, सीताफळ अशा वेगवेगळ्या झाडांच्या बिया, कडधान्य वापरून आकर्षक अशा राख्या तयार केल्या. तिरंगी धाग्यांपासून बनवलेल्या राख्या प्रत्येकाच्या नजरेत भरत होत्या. स्थानिक परिस्थितीत उपलब्ध असणाऱ्या या साहित्याचा पुरेपूर वापर करत आणि गावातील महिला श्वेता प्रसाद कुलकर्णी, नौशाद नूरमोहम्मद शेख, सारिका अमित पाटील, कोमल नामदेव मोरे यांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक राख्या बनवल्या. स्वतःची कल्पनाशक्ती वापरून आणि स्वतःच्या हाताने राखी बनवताना स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

या तयार केलेल्या राख्यांपैकी काही राख्या शाळेमधील रक्षाबंधन कार्यक्रमासाठी केल्या आहेत तर काही राख्या भारताच्या रियल हिरोंना अर्थात भारतीय सैनिकांसाठी कारगिल, जम्मू, अनंतपुरा काश्मीर अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी पाठवल्या आहेत.
आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या आणि आपल्या परिवारापासून दूर असणाऱ्या सैनिकाविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बालवयातच आत्मीयता, आदरभाव वाढीस लागावा, राष्ट्र निर्मितीमध्ये समर्पण भावना वाढीस लागावी आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकताही वाढीस लागावी म्हणून हा उपक्रम राबवत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना बालवायातच पर्यावरण आणि राष्ट्रभक्ती विषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने शाळेमध्ये राबवलेल्या या उपक्रमाबाबत करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे, शि. वि. अ. नितीन कदम, केंद्रप्रमुख महावीर गोरे, सरपंच सुवर्णा अविनाश मोरे शा.व्य.स.अध्यक्ष संतोष झेंडे यांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि सहशिक्षक किरण जोगदंड तसेच सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.