करमाळा प्रतिनिधी

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर दोन या शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सैन्यांमध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान देणारे सैनिक ज्ञानेश्वर गलांडे आणि तात्याबा मोरे यांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला.

      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. २ येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात आला. मुलांमध्ये आणि गावातील युवा वर्गामध्ये देशप्रेम वाढीस लागावे, सैनिकांविषयी आदराची भावना वाढीस लागावी, विद्यार्थ्यांना बालवयातच देश प्रेमाचे धडे मिळावेत आणि यातून भविष्यकाळात देशभक्त नागरिक निर्माण व्हावेत यासाठी गावातील आणि परिसरातील सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सैन्यामध्ये आपले अनमोल योगदान देणारे ज्ञानेश्वर मेजर गलांडे आणि तात्याबा मोरे यांचा सन्मान करण्यात आला. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच शाळेच्या विद्यार्थिनी त्रिवेणी रणसिंग आणि श्रद्धा धायगुडे यांनी सैनिक ज्ञानेश्वर गलांडे यांचे औक्षण केले. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले. भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान – जय किसान अशा देशभक्तीपर घोषणा देत शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी वातावरण दणाणून सोडले. 

  ग्रामपंचायतचे पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गावातील जेष्ठ नागरिक शाळेतील शिक्षक या सर्वांच्या उपस्थितीत आणि या सर्वांच्या हस्तेच फेटा, पुष्पगुच्छ, हार, नारळ, शाल देऊन या सैनिकांचा जंगी सन्मान करण्यात आला.

    आपण सर्वांनी मोठ्या आदराने केलेला सन्मान आणि आमच्याविषयी दाखवलेला आदर आयुष्यभर लक्षात राहील. असा अविस्मरणीय असा सत्कार जीवनात पहिल्यांदाच होतोय हा क्षण पाहून मला खूप गहिवरून आले आहे. मी आपल्या गावचा आणि शाळेचा सदैव ऋणी राहील असे भावनिक मनोगत मेजर ज्ञानेश्वर गलांडे यांनी मांडले.

    आपल्या समस्त सैनिक बंधूंमुळेच आम्ही देशात राहणारे सर्व नागरिक सुरक्षित राहतो, त्यामुळे आभार तुम्ही नाही तर आम्हीच मानले पाहिजेत, आपल्या सैनिकांविषयी आदर भावना आणि अभिमान बाळगणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे असे कृतज्ञता व्यक्त करणारे मनोगत शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी मांडले.

     यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच सुवर्णाताई मोरे व सर्व पदाधिकारी शा व्य समितीचे अध्यक्ष संतोष झेंडे व सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे सहशिक्षक किरण जोगदंड,  गावातील आजी-माजी पदाधिकारी, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ तसेच विशेष उल्लेखनीय  म्हणजे महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

       विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये देश प्रेम वाढविणारा उपक्रम शाळेमध्ये प्रभावीरीत्या राबविल्याबद्दल गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे, शि.वि.अ. नितीन कदम, केंद्रप्रमुख महावीर गोरे तसेच समस्त ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि सहशिक्षक किरण जोगदंड यांचे भरभरून कौतुक केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *