करमाळा प्रतिनिधी

माय.., तुला पुजावं देव्हाऱ्यात

असं खूपदा वाटलं…

पण लख्खन जाणवलं

देव्हा-यात तर दगडं पूजली जातात

तीच दगडं…

ज्यानं तू रक्तबम्भाळ झाली होतीस.. जेव्हा

परंपरेच्या साखळदंडातून

स्त्रियांची सुटका करण्यासाठी तू

अक्षर शिकायला,

गिरवायला

निघाली होतीस

शेटजींचं बोट धरून

फातिमाबी सह,

त्याच भिडे वाड्यात…

अस्पृश्यांसाठी तू ..हौद खुला करून दिला..

प्रवाह विरोधात उभी राहिलीस

कणखरपणे…

बाईच्या स्वतंत्र्यासाठी तू

लढली नसतीस तर..?

(नुसत्या विचारानंच थरकाप होतोय गं..)

माय… तू पाटलांची लेक

फुल्यांची फक्त सून नव्हतीस,

तर…

तू होतीस एक वाघीण

व्यवस्थे विरुद्ध लढणारी…

काल भिडे वाड्यात जाऊन भेटावं वाटलं,

तुझ्या स्मृर्तींना, तुझ्या त्यागाला.

रक्ताळलेल्या डागांना

जिथं तू अनेक महिलांची

बाळंतपणं केलीस,

जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन…

तू थोडी ही बिथरली नाहीस.

तुझ्या विचांरांची उंची कुठल्या मोजपट्टीने मोजू?

भिडे वाडा शोधू लागले

विचारू लागले…

एके ठिकाणी दिसल्या रांगा

शिक्षित महिलांच्या,

तुडुंब गर्दी

धक्काबुक्की

पेढ्या, लाडूचे पुडे

हार, फुले

पुढे व्हा! चला सरका बाजूला!

हे काय ?इतकी गर्दी!!

भिडेवाडा पाहायला!…

नाही हो..!

हा भ्रमनिरास..

निव्वळ भ्रमनिरास!

माय…

अंधारातून प्रकाशाकडे

ज्ञानाकडे ,विज्ञानाकडे..

जाणारा मार्ग जिथून तू दाखवला

तो भिडे वाडा दिसला..

देशातील पहिली मुलींची शाळा

(१९४८)

इथं गर्दी नव्हती..

चिटपाखरूही नव्हतं..

धक्काबुक्की चा प्रश्नच नव्हता.

जुनाट मोडकळीस आलेला

विद्येच्या माहेरघरात

एकाकी पडलेला पडका

पण,ऐतिहासिक भिडेवाडा..

धूळ पडलेल्या कोनाड्यात

शेटजींची आणि तुझी          

तस्वीर दिसली…

मी नतमस्तक झाले..

माय…

या लाकडी जिन्यावरून

तू कितीदा वर खाली धावली असशील ?दमली असशील?

अंधार भेदून काढणा-या            

या खोलीत अभ्यासाला

बसली असशील!

धुळीचा आडवा टिळा मी

कपाळी लावला..

‘पोरींना शिकवू नका’ म्हणून

विरोध करणा-या सनातनी

लोकांविरुद्ध तू आडवी झालीस

ना अगदी तसाच!

काळीज पिळवटून गेलं

हे सारं भोवतालचं  बघून.

समर्पण, त्याग

या गोष्टी समाजानं विसराव्यात?

काळीज पोखरून काढणाऱ्या

वेदनेसह मी पाठमोरी झाले.

वाड्याला पाठ नको दावायला

म्हणून

पाणवलेल्या डोळ्यातील कडांसह

वाड्याकडं तोंड करत

पाच पावलं चालले..

अन् सर्रकन माघारी फिरले…

माय..

पुणं खूप बदललय..

कितीतरी बदललय..!!

इतकं बदललय की,

स्त्री उद्धाराचं पवित्र क्षेत्रच

आज हरवून टाकलंय…

भग्नावस्थेत ते….जीर्ण झालय

जीर्ण झालय…

जेष्ठ साहित्यिका,

अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.सोलापूर

७७०९४६४६५३.

(लेखिका वक्ता विचारवंत सामाजिक कार्यकर्त्या आहेत)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *