
करमाळा प्रतिनिधी
कोल्हापूर येथील शिवसेनेच्या अधिवेशनात माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन करमाळा तालुक्यातील नियोजीत रीटेवाडी उपसा सिंचन योजनेबद्दल निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी या प्रश्नावर मंत्रालयात एक बैठक लावून यास अंतिम स्वरूप देण्याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. कोल्हापूर येथे शिवसेना पक्षाचे अधिवेशन चालू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक

म्हणून ओळखले जाणारे करमाळा मतदार संघाचे माजी आमदार नारायण पाटील यांनी आपली उपस्थिती दर्शविली. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी प्रत्यक्ष भेट घेऊन करमाळा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत

यासाठी साकडे घातले. यावेळी खासदार राहुल शेवाळे समवेत होते. खास करून रीटेवाडी उपसा सिंचन योजनेबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांनी ही योजना करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागात किती महत्वाची ठरणार आहे याबद्दल तळमळीने सांगितले. कुकडी योजनेतून करमाळा तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळत नसल्याने आता कुकडीला पर्यायी मार्ग म्हणून रीटेवाडी उपसा सिंचन योजना ही लवकरात लवकर कार्यान्वित होणे गरजेचे आहे अशी मागणी केली. यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक लावण्याचे आश्वासन दिले. यापूर्वी करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना संबोधित करताना नारायण पाटील यांच्या रीटेवाडी उपसा सिंचन योजनेबद्दल मी स्वतः लक्ष देऊन पुढील

कार्यवाही करण्याचे आदेश देणार असल्याचे आश्वासन दिले होते. यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व माजी आमदार नारायण पाटील यांची कोल्हापूर येथील भेट आणि चर्चा रीटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या प्रश्न सोडवण्यास भाग पडणार का अशी चर्चा सर्वत्र चालू आहे.