तालुक्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुक लढवणार आहे – डॉ अरुण अडसूळ
करमाळा प्रतिनिधी
करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाच्या युवा वर्गाला अपेक्षित शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य,वीज, पाणी ,रस्ते आदी विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी आणि राजकीय विकास करण्यासाठी सुशिक्षित आणि निस्वार्थी लोकप्रतिनिधीची उणीव

भरून काढण्यासाठी करमाळा माढा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी जाहीर केले आहे. शुक्रवार दि. १६ रोजी सकाळी अकरा वाजता करमाळा शहरातील हॉटेल राजयोग येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.याबाबत सविस्तर बोलताना डॉ. अडसूळ यांनी सांगितले आहे

की, गेल्या २५ वर्षांपासून शहर व तालुका शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक बाबतींत मागास आहे. मतदार संघातील विद्यार्थ्यांसाठी पुरेशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी कॉलेजेस, तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी मोठे औद्योगिक प्रकल्प, आरोग्य विषयक सोईसुविधांसाठी सक्षम हॉस्पिटल्स आदी बाबींसाठी मतदारसंघाला सुशिक्षित

लोकप्रतिनिधीची नितांत गरज असून ही गरज भरून काढण्यासाठी विधानसभा लढवणार असल्याचे डॉ. अडसूळ यांनी सांगितले आहे. डॉ. अरुण अडसूळ यांनी सेवेत असताना करमाळा व परिसरातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींबाबत नेहमीच मदत आणि मार्गदर्शन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना त्यांचा सर्वच पक्षांच्या राजकीय धुरंधरांशी सततचा

संपर्क आहे. त्यामुळे करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचा सर्वंकष विकास घडवून आणण्यासाठी मतदारसंघातील चाणाक्ष जनता राज्यातील नामांकित विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंना निवडणुकीच्या परीक्षेत ‘पास’ करून नक्कीच आमदार करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *