
कमलाई नगरी प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या सत्तेच्या साठमारीमुळे, फोडाफोडी आणि जोडाजोडीमुळे राज्यातील जनतेचे खऱ्या अर्थाने वाटोळं झालं आहेच, शिवाय सोलापूर जिल्ह्याची खूप मोठी हानी झाली आहे. सत्तेच्या या चार-साडेचार वर्षात सोलापूर जिल्ह्याला सरपंच बदलल्याप्रमाणे ६ पालकमंत्री लाभले. अशा या जिल्ह्याचा कळवळा नसलेल्या गेटकेन पालकमंत्र्यांमुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणी वाटपाचा बट्ट्याबोळ झाला असल्याचा घनघात जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे-पाटील यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, उजनी धरण ही सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी आहे. लाखो शेतकऱ्यांची कुटुंबे या उजनीवर जगतात. यंदा पावसाने बऱ्यापैकी ओढ दिल्याने उजनी धरणाने सत्तरी देखील पार केली नाही. आज फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वार्ध आजमितीला हे सुमारे ६५ टक्के पाणी संपून उजनी मायनस ११ मध्ये पोहचली आहे. म्हणजे अजून मार्च, एप्रिल, मे, जून या चार महिन्यात सोलापूर जिल्ह्याच्या पाण्याचे नियोजन काय असणार आहे हे ना शासनाला माहित आहे ना प्रशासनाला माहित आहे.

आज उजनी मायनस आहे हे माहित असताना देखील कालव्याला आजही मागणी नसताना पाणी सोडले जात आहेत. हे पाणी ९ तारखेला बंद होणार होते, मात्र ते अद्याप बंद करण्यात आलेले नाही. पालकमंत्र्याला तर पाण्याचा प देखील माहित नाही. विशेष म्हणजे सर्व पालकमंत्र्यांच्या बाबतीत असंच घडलं आहे. पाणी वाटप नियोजन समिती आणि जिल्ह्यातील सर्व आमदार मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे उजनीच मातेरं करण्याचा विडा शासन आणि प्रशासनाने घेतला की काय अशी शंका उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

