
करमाळा प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना योजनेनुसार कमी उत्पन्न असलेल्या वर्गातील लोकांना वार्षिक 330/- रुपये वीमा प्रदान केला जातो. या योजनेनुसार लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 2 लाख रुपये दिले जातात. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या करमाळा शाखेच्या वतीने या योजनेचा लाभ घेतलेल्या २ खातेदारांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांचा चेक नुकताच देण्यात आला.

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या करमाळा शाखेच्या खातेदार कविता विकास मल्हारे (रा. निंभोरे, ता. करमाळा) तसेच खातेदार मनीषा बिभीषण कानगुडे (रा. देवळाली, ता करमाळा) यांचे विमा कालावधी दरम्यान निधन झाले होते. तदनंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून मल्हारे यांचे बंधू संतोष गोकुळदास देवकर (रा.वरकटणे, ता. करमाळा) तसेच कानगुडे यांचे पती बिभीषण उद्धव कानगुडे या वारसांच्या खात्यावर प्रत्येकी रु. दोन लाख जमा झाले आहेत.

सदर विम्याच्या रकमेचा उपयोग मयताच्या अपत्यांच्या शिक्षणासाठी होणार असल्याचे दोन्ही वारसदारांनी सांगितले आहे. याप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडिया करमाळा शाखेचे व्यवस्थापक अजय मालु, कर्मचारी निलेश उकुंडे, दादासाहेब जाधव, किरण माळी, ग्राहक सेवा केंद्राचे (CSP) गणेश केंडे उपस्थित होते.


