
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तहसील कार्यालया समोर मकाई सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी गत वर्षी (2022-23) गाळप केलेल्या उसाचे पैसे अद्याप न मिळाल्याच्या निषेधार्थ दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली भव्य बोंबाबोंब आंदोलन केल आहे. यावेळी एका शेतकऱ्याने भावना अनावर होऊन अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे कारखान्याचे संबंधित संचालक पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
दरम्यान उदासीनतेतून शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचं टोकाच पाऊल उचलताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कुर्डूवाडी येथून प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर ह्या तात्काळ तहसील कार्यालयात दाखल झाल्या अन प्रभारी नायब तहसीलदार

विजयकुमार जाधव व इतर संबंधित शासकीय व पोलीस अधिकाऱ्यांच्या समवेत शेतकऱ्यांच्या निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी त्यांनी उपस्थित आंदोलक शेतकऱ्यांना त्यांचं हक्काचं ऊस बिल त्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा करण्याच व तसेच वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर कारखान्याच्या संपत्तीचा लिलाव करण, संचालकाच्या मालमत्तेवर

बोज्या चढवन,व कारखान्याच्या संबंधित चेअरमन संचालक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाचे संबंधित निर्णय, विधी व न्याय विभागाच्या अभिप्राय नंतरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच आश्वासन दिलं.

यावेळी प्राध्यापक रामदास झोळ सर म्हणाले की, लवकरात लवकर शेतकऱ्यांची त्यांच्या हक्काची ऊस बिले त्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर हे आंदोलन अजून तीव्र केल जाईल अन होणाऱ्या परिणामांना कारखान्याचे संबंधित चेअरमन संचालक शासन यंत्रणा जबाबदार असल्याच सांगितले.
दरम्यान कामगार नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ कांबळे यांनीही कारखान्याच्या चेअरमन संचालक व इतर पदाधिकाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवत त्यांचा खरपूस समाचार घेत लवकरात लवकर ऊस बिले न दिल्यास कारखान्याच्या चेअरमन संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनीही त्यांची मनोगते व्यक्त केली.
यावेळी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, अॅड. राहुल सावंत, राजेश गायकवाड, हरिभाऊ झिंजाडे, विठ्ठल शिंदे, शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, सुदर्शन शेळके, भगवान डोबाले, अंजनडोह चे माजी उपसरपंच शहाजी माने, हरिदास मोरे, इतर मोठया संख्येने ऊस पुरवठादार शेतकरी, संबंधित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी नेते उपस्थित होते.