जेऊर प्रतिनिधी

जेऊर ग्रामपंचायतीची सध्या पंचवार्षिक निवडणूक सुरू असताना सरपंच पदासाठी उभे असलेले एक उमेदवार उघडपणे मतदारांना पैसे वाटप करत असून या प्रकरणी प्रशासन ढिम्म असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बालाजी गावडे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सध्या आचारसंहिता सुरू असताना देखील ग्रामपंचायतीकडून रस्त्यावर मुरूम टाकणे, गटारींचे चेंबर्स बांधणे याचबरोबर ग्रामपंचायत प्रशासकीय इमारतीचा वापर आजवर ग्रा.पं. ची सत्ता असलेल्या गटाकडून प्रचार आणि त्या अनुषंगाने खुलेआम होत आहे. त्याचप्रमाणे विरोधी पॅनलच्या उमेदवारांनी रीतसर परवानगी घेऊन लावलेले असताना ते रातोरात काढून नेणे अशा प्रकारे आचारसंहितेचा भंग होत असून स्थानिक प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे गावडे यांनी या निवेदनामध्ये म्हंटले आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी-माढा विभाग, पोलीस निरीक्षक करमाळा, गटविकासाधिकारी पं.स.करमाळा, ग्रामसेवक व तलाठी जेऊर यांना देण्यात आल्या आहेत. या तक्रारीविषयी अधिक माहिती देताना गावडे हे म्हणाले की, १९९१ पासून या ग्रामपंचायतीच्या सत्तेवर एका व्यक्तीने कसा कब्जा केला आणि तो कसा टिकवून ठेवला हे जगजाहीर असल्याने त्याबद्दल सविस्तर बोलण्याची आवश्यकता नाही. मात्र गेली तीन वर्षे प्रशासक असताना देखील ग्रामपंचायत इमारतीवर व प्रशासनावर याच व्यक्तीचा अंमल कसा राहू शकतो ? आणखी विशेष म्हणजे ही इमारत गेल्या अनेक वर्षांपासून ही व्यक्ती आपल्या खाजगी प्रॉपर्टीप्रमाणे सगळ्याच कामांसाठी वापरत आहे, सध्या निवडणूक काळातदेखील हाच प्रकार चालू कसा असा संतप्त सवाल या वेळी बोलताना गावडे यांनी केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *