
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाची मुदत संपलेली असताना नव्या संचालक मंडळाच्या नियुक्तीसाठी निवडणूक खर्च न झाल्यामुळे त्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. तर आता पुन्हा नव्याने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर यांनी पुन्हा एकदा निवडणूक खर्चाची राहीलेली रक्कम भरण्याची नोटीस दिली आहे

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी कारखान्याच्या संचालक मंडळाची 30 डिसेंबर 2022 रोजी मुदत संपुष्टात आली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे आदेशान्वये यापूर्वी पत्र देऊन निधी भरणे बाबत सूचना करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने दहा लाख इतका भरणा करण्यात आला आहे. तर अद्यापही 25 लाख 29 हजार रुपये येणे बाकी आहे. सदरची भरणारक्कम न केल्याने संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आलेले होते. परंतु अद्याप सदरची रक्कम भरणा केलेली नाही.

निवडणूक घेणेबाबत प्राधिकरणाने सक्त सूचना दिलेल्या असून तात्काळ निवडणूक खर्च निधी भरणे आवश्यक आहे. तरी तात्काळ उर्वरित निवडणूक निधी भरणा करण्यात यावा. जेणेकरून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करता येईल व नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईल अशी आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र आदिनाथ प्रशासकीय अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.