
उजनीच्या पाणी वाटप समितीमध्ये धरणग्रस्तांचा प्रतिनिधी नसल्याने तालुक्यावर अन्याय होत आहे – मा. आ. नारायण पाटील
जेऊर प्रतिनिधी
उजनीच्या पाणी वाटप समितीमध्ये धरणग्रस्तांचा प्रतिनिधी नसल्याने करमाळा तालुक्यावर अन्याय होत असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना याबाबत चर्चा करून वास्तव लक्षात आणून देणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिक विस्ताराने बोलताना पाटील यांनी सांगितले की उजनी धरणाच्या निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील तीस लहान मोठ्या गावांनी त्याग केला व या राष्ट्र हिताच्या प्रकल्पासाठी आपल्या वहीत जमिनी दिल्या. तीस गावांनी राहते घरे, शेतीवाडी, विहीर, वाडे याचा विचार न करता आख्खी गावे पाण्याखाली जाऊ दिली व हे प्रकलपग्रस्त

माळरानावर राहून नव्याने शेती करू लागले.लवादाच्या पाणी वाटप निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांसाठी दोन टी एम सी पाणी राखून ठेवले पाहिजे पण वस्तुस्थिती तशी राहत नाही. उजनीतील गाळ व पाणी याचा विचार करताना करमाळा तालुक्याचे हक्काचे पाणी कुठे मुरून जाते हे समजत नाही. यासाठी करमाळा तालुक्यातील एक प्रतिनिधी या कालवा सल्लागार समितीत असावा ही आपण या अगोदरच मागणी केली आहे.यंदा उजनीच्या पाणी साठ्यात वाढ होताना खाली नदीपात्रात तसेच इतर शहरात पाणी सोडण्याचा निर्णय समितीने नुकताच घेतला. वर्षभराच्या नियोजनात विविध कालवे, बोगदा व उपसा सिंचन योजना साठी आठ टी एम सी पाणी राखून ठेवले तर सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी अठरा टी एम सी पाणी राखून ठेवले. धाराशिव, कर्जत जामखेड व बारामती, इंदापूर या इतर योजना व एम आय डी सी साठी दहा टी एम सी पाणी राखून

ठेवले आहे. आषाढी एकादशी वारी साठी दोन टी एम सी पाणी सोडले जाणार आहे. तर कडक उन्हाळ्यात बाश्पीभवनामुळे आठ टी एम सी पाणी उडून जाते असे सांगण्यात येते. या सर्व नियोजनात प्रकल्पग्रस्तांसाठी किती पाणी राखून ठेवले हे कागदावर येतच नाही व ही बाब आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वास्तवदर्शी माहिती सांगणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर विद्यमान आमदार महोदयांना करमाळा तालुक्यातील शेतकरी, धरणग्रस्त यांच्या प्रश्नांचे काही देणे घेणे नाही. माजी आमदार नारायण पाटील यांनी 2014 ते 2019 मध्ये प्रत्येक अधिवेशनात उजनीचे पाणी व पुनर्वसन हे मुद्दे लावून धरले असून त्याचा लेखाजोखा आजही उपलब्ध असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.