तुळजाभवानी मंदिर न हलविण्याचा सर्वानुमते निर्णय : या विषयी संभ्रम पसरवू नये !

करमाळा प्रतिनिधी – देवीचामाळ पायथ्यापाशी असलेले तुळजाभवानीचे मंदिर न हलविता मंदिराच्या दोन्ही बाजूने रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात यावे असा निर्णय आ. संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत सर्वानुमते झालेला असताना या संदर्भात काही विघ्नसंतोषी मंडळी मिडीयाच्या माध्यमातून स्वतःचे नसलेले महत्व वाढविण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मकाईचे माजी संचालक तथा आ. संजयमामा शिंदे समर्थक विवेक येवले यांनी दिली आहे.

शुक्रवार दि. ५ मे रोजी तहसील कार्यालयामध्ये या विषयावर निर्णय घेण्यासाठी आ. संजायमामांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या या बैठकीस प्रभारी तहसीलदार विजय जाधव, सा. बां. चे उपअभियंता के. एम. उबाळे, एन. पी. इन्फ्रा कंपनीचे अधिकारी श्री. बनसोडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. व्ही. जाधव, देवीचामाळ ग्रा. पं. चे सरपंच महेश सोरटे,

उपसरपंच दीपक थोरबोले व सर्व सदस्य, कमलाभवानी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे व सदस्य तसेच देवीच्या माळावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी तुळजाभवानीचे मंदिर हलवून बाजूला घेण्यात यावे या प्रस्तावाला माळावरील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केल्यानंतर ग्रामस्थांच्या भावना व श्रद्धा लक्षात

घेऊन हे मंदिर जागेवरच ठेऊन मंदिराच्या पूर्वेकडून व पश्मिमेकडून रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेऊन आ. संजयमामांनी त्यासाठी मंदिराच्या मागील बाजूस असलेली महावितरण कंपनीची आवश्यक तेवढी जागा अधिग्रहित करण्याचे निर्देश व सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या व हा विषय संपल्याने पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी संजयमामांनी बैठकीतून प्रस्थान केले हे सर्वश्रुत असताना या बैठकीत गोंधळ झाल्याने निर्णय न होताच संजायामामा बैठकीतून निघून गेले असा अपप्रचार करणाऱ्याची वृत्ती ही जगजाहीर आहे. असे उद्योग करणाऱ्या व सर्वत्र उपद्रव निर्माण करणाऱ्या या अपप्रवृत्तीची लायकी ही समाजाला ठाऊक आहे तसेच या अपप्रवृत्तीचे समाजाचे स्थान हे देखील सर्वांना ठाऊक असल्याने अशा प्रवृत्तीची कवडी-किंमत माहीत असल्याने या विषयी जाणूनबुजून व या विषयाशी काडीचाही संबंध नसताना अकारण लुडबुड करणाऱ्या या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करून त्याची लायकी पुन्हा एकदा दाखवून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना येवले यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *